अशोक पाटील ठरणार 'जायंट किलर'; एकसंघपणा हिच भांडुपमध्ये महायुतीची ताकद

Maharashtra Assembly Election 2024 : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भांडुप पश्चिम विधानसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलाय. मुंबईतील कोकणी माणसांचा मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख सांगितली जातेय. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे या मतदारसंघातून निवडणूक लढविणार अशी चर्चा असल्याने हा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला होता. मात्र नंतर अमित ठाकरेंनी भांडूपऐवजी माहिम मतदारसंघ निवडला.

भांडूप मतदारसंघात आता दोन शिवसेनेत लढत होत आहे. शिवसेना (ठाकरे) गटाचे उमेदवार विद्यमान आ. रमेश कोरगावकर आणि शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघाची गणिते आता बदलली आहे. शिवाय शिवसेनेत पडलेली फूट, मनसेची माघार आणि भाजपचा वाढलेला प्रभाव या मुद्यांमुळे येथील निवडणुकीत यंदा शिवसेनेच्या शिंदे गटाला चांगली स्थिती असल्याचे बोलले जात आहे.

Ashok Patil

कशी आहे यावेळची स्थिती?

या मतदारसंघात 2 लाख 98 हजार 510 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 68 हजार 234 इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 31 हजार 255 इतकी आहे. या मतदारसंघात 70 टक्के मराठी भाषिक लोकांचे वास्तव्य आहे. त्यासोबतच भांडुपमध्ये उत्तर भारतीय, दाक्षिणात्य, मुस्लीम, गुजराती आणि शीख असे सर्वधर्मीय लोक राहतात. हा मतदारसंघ केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक घडामोडींचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून भांडुप विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांचा मात्र अभाव पाहायला मिळतो. त्यामुळेच यंदा महायुतीसाठी येथे पोषक वातावरण असल्याचे बोलले जातेय.

मतदारसंघातील समस्या कायम

भांडुप मतदारसंघात अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. भांडुपमधील अनेक रस्ते हे अरुंद आहेत. यामुळे बहुतांश वेळा या भागात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दुसरीकडे भांडुपमध्ये एकही शासकीय रुग्णालय नाही. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण, मनोरंजनासाठी नाट्यगृह, सांस्कृतिक केंद्राचीही सुविधाही इथे उपलब्ध नाही. भांडुपमध्ये नाले रुंदीकरणचा प्रकल्पही अद्याप कागदावर आहे. कचऱ्याची विल्हेवाटही रोजच्या रोज लागत नसल्याच्या येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. सांडपाण्याची सुविधा नसल्याने येथे पावसाळ्यात तुंबलेल्या गटारी व चिखलमय रस्ते अशा समस्यांचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे विद्यमान आ. रमेश कोपरगावकर यांना ही निवडणूक सोप्पी नसल्याचे बोलले जात आहे.

आजी- माजी आमदारांच्या लढतीत रंगत

या मतदारसंघात सध्या शिवसेना ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आमदार आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांत मुलभूत प्रश्न सोडविण्यात त्यांना अपयश आल्याचे सांगितले जाते. भांडूप पश्चिमेतील झोपडपट्टी पुनर्वसन, रुग्णालयाचा आभाव, रस्त्यांची दुरावस्था, सांडपाणी व पिण्याच्या पाण्याची असुविधा हे प्रश्नांमुळे कोरगावकरांचा यंदाचा पेपर अवघड असल्याचे बोलले जातेय. त्याऊलट शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील हे 2014 मध्ये या मतदारसंघात आमदार होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात.

मतविभागणी पाटील यांच्या पथ्यावर

भांडुप पश्चिममध्ये दोन आजी-माजी आमदारात मुख्य लढत होणार आहे. मात्र तरीही या मतदारसंघात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 च्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे अशोक पाटील यावेळी विद्यमान आमदारांना जोरदार लढत देणार आहे. त्यावेळी भाजपचे मनोज कोटक यांना 36 हजाारांचे मताधिक्य होते.

आता महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचा अजित पवार गट एकत्र आहे. त्यामुळे महायुतीची ताकद एकसंघ आहे. त्याऊलट ठाकरे गटाच्या आमदाराला मनसेच्या शिरिष सावंत यांच्यातील मतविभागणीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्नेहल सोहनी, बसपाचे रवी थाटे यांच्यासह इतर अपक्षही रिंगणात आहेत. मात्र महायुतीचा एकसंघपणा या निवडणुकीत जमेची बाजू असल्याचे बोलले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+