Crime:भंडाऱ्यात 'सैराट'ची पुनरावृत्ती! 6 हजारांच्या सुपारीत सासू अन् मेहुण्याने काढला जावयाचा काटा
Bhandara honor killing : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' चित्रपटातील ऑनर किलिंगची दाहकता आजही समाजात जिवंत असल्याचे एका थरारक घटनेने सिद्ध झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील बेटाळा गावात एका सासूने आणि मेहुण्याने आपल्याच जावयाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या सहा हजार रुपयांच्या सुपारीत हा रक्ताचा खेळ खेळला गेला असून, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच जुळले होते लग्नाचे नाते
मृत युवक आकाश शेंडे (२४) याने अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच गावातील एका तरुणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. कुटुंबाचा या विवाहाला तीव्र विरोध होता, मात्र मुलीने प्रेमासाठी घराची पर्वा न करता आकाशसोबत संसार थाटला. नवविवाहित दाम्पत्य बेटाळा गावातच राहत होते. मात्र, आपल्याच गावात जावयाचा वावर मुलीच्या आईला आणि भावाला सहन होत नव्हता.
हत्त्या करून 'आत्महत्ये'चा बनाव
सोमवारी आकाशचा मृतदेह गावालगतच्या नाल्यात आढळून आला होता. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय निर्माण करण्यात आला. मात्र, मोहाडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सखोल तपास सुरू केला. शवविच्छेदन आणि तांत्रिक तपासातून ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जेव्हा संशयितांची उलटतपासणी केली, तेव्हा सासू आणि मेहुण्याने रचलेला हत्येचा कट उघड झाला.
केवळ ६ हजार रुपयांत जावयाचा गेम
पोलिस तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. जावयाला संपवण्यासाठी सासू आणि मेहुण्याने बाहेरील गुंडांना सुपारी दिली होती. धक्कादायक म्हणजे, एका तरुणाचा जीव घेण्यासाठी केवळ ६ हजार रुपये देण्यात आले होते. या पैशांसाठी आरोपींनी आकाशची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह नाल्यात फेकून दिला.
५ आरोपी गजाआड
मोहाडी पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत मुख्य सूत्रधारांसह पाच जणांना अटक केली आहे. अंजू कुंभलकर (४३) - मृतकाची सासू, चेतन कुंभलकर (२३) - मृतकाचा मेहुणा, भारत मोहतुरे (२६) - सुपारी घेणारा आरोपी, महेंद्र बोरकर (३१) - साथीदार, दिनेश उर्फ सचिन ईश्वरकर (३७) - साथीदार यांना अटक करण्यात आली आहे.
जाचाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेची आत्महत्या
भंडाऱ्यात सासरच्यांनी जावयाला संपवले असतानाच, पुण्यातूनही एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. उरुळी कांचन येथील सोरतापवाडीत दीप्ती मगर चौधरी या इंजिनिअर विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.












Click it and Unblock the Notifications