खबरदार..! जर कुणी पिस्तूल घेऊन... बीडच्या नव्या पोलिस अधिक्षकांनी घेतली अँक्शन
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता सीआयडी आणि पोलिस हे दोघेही अँक्शन मोडमध्ये आले आहेत. नवे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांनी आज प्रसार माध्यमांसमोर त्यांच्या नव्या योजनेविषयी सांगून टाकलं. सिंघम अधिकारी अशी ओळख असलेल्या नवनीत काँवत यांनी बीडच्या तरुणांना दिलेल्या धमकीवजा इशाऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँवत यांच्या या इशाऱ्यामुळे बीडमध्ये लवकरच शांतता प्रस्तापित होईल, असे बोलले जात आहे.

काय म्हणाले नवनीत काँवत
नवनीत काँवत यांनी आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. ही भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बीड जिल्ह्यात कुणाला शस्त्र परवाने दिले आहेत, त्या सर्वांची चौकशी सुरु आहे. शस्त्र परवाना असणार्या किती जणांवर गुन्हे दाखल आहेत आणि ते गुन्हे कोणत्या प्रकारातील आहेत, याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. आता कुणाचे शस्त्र परवाने ठेवायचे व कुणाचे शस्त्र परवाने काढून घ्यायचे, याचे अँनलिसीस सुरु आहे. लवकरच ज्यांना गरज आहे, फक्त तेवढेच शस्त्र बीड जिल्ह्यात दिसतील, असा विश्वास एसपी नवनीत काँवत यांनी व्यक्त केला.
तरुणांना दिला इशारा
काही तरुणांनी हातात पिस्तूल घेऊन सोशल मीडियावर व्हिडीओ केला आहे. याबाबत बोलताना नवनीत काँवत म्हणाले, बंदूक घेऊन ज्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांपर्यंत ज्या-ज्या पोस्ट पोहोचतील, त्या-त्या व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. पिस्तूल किंवा बंदुकीसह फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्या तरुणांनी आता कायद्याच्या धाकात रहावे. कुणाचीही यापुढे गय केली जाणार नाही, असा थेट धमकीवजा इशाराच एसपी नवनीत काँवत यांनी दिला.
सरपंच हत्येबाबत म्हणाले...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबतही काँवत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, सरपंच संतोष देशमुख हत्येचा तपास सध्या सीआयडी करुन सुरु आहे. सीआयडीला ज्या-ज्या बाबतीत आमची मदत लागते, ती-ती मदत करणे सुरु आहे. लवकरच सगळे चित्र स्पष्ट होईल. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना आलेल्या धमकीच्या मॅसेजचा तपासही झाला आहे. एकाने दारु पिऊन मॅसेज पाठवला होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे. त्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती काँवत यांनी दिली.












Click it and Unblock the Notifications