वाल्मिक कराडला तुरुंगात श्वसनाचा त्रास, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून उपचार सुरु
Walmik Karad Health Update : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी वाल्मिक कराडच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शनिवारी दुपारी वाल्मिक कराडला श्वसनाचा त्रास आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्याची तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी रक्ताची चाचणी आणि सिटीस्कॅन तपासणी केली असून आता वैद्यकीय अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतर त्याच्या पुढील उपचार आणि तुरुंगातील परिस्थितीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
शनिवारी, 26 एप्रिल 2025 रोजी दुपारच्या सुमारास वाल्मिक कराडला तुरुंगात श्वसनाचा त्रास आणि बोलताना त्रास जाणवू लागला. तुरुंग प्रशासनाने त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात हलवले, जिथे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली. कराड श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसताच डॉक्टरांनी सिटीस्कॅन तपासणीचा सल्ला दिला. त्यानंतर कराडची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. तुरुंगातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, वैद्यकीय अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे, आणि त्यानंतरच पुढील उपचार योजना ठरवली जाईल.

वाल्मिक कराड हे बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कराड आणि त्याच्या टोळीवर आरोप ठेवण्यात आले. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.
या हत्येप्रकरणी कराडसह अनेक जणांना अटक झाली असून ते सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत. तुरुंगात त्याच्या आणि इतर कैद्यांमधील वादविवाद आणि हाणामारीच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. कराडला तुरुंगात व्हीआयपी उपचार मिळत असून, पोलिसांकडून त्याला संरक्षण दिले जात असल्याचा आरोप काही राजकीय पक्षाकडून करण्यात आला होता.
तुरुंग अधिका-यावर निलंबनाची कारवाई
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार वाल्मिक कराड ज्या तुरुंगात आहे, त्या तुरुंगाचे वरिष्ठ अधिकारी डी. डी. कवाळे आणि महिला शिपाई सीमा गोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रक्ताच्या नातेवाईकांव्यतिरिक्त इतर लोकांना कैद्यांना भेटू दिल्याचा मोठा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच दक्षता पथकांच्या तपासणी दरम्यान कारागृहात अनेक त्रुट्या आढळून आल्यानेही ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.












Click it and Unblock the Notifications