बीडच्या राजकारणात मोठा भूकंप! अजितदादांना धक्का, योगेश क्षीरसागरांचा पत्नीसह BJPमध्ये प्रवेश!
Yogesh Kshirsagar and his wife Joins BJP : नगरपालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे बीडच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) यांचे बंधू आणि अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर योगेश क्षीरसागर यांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी सोडण्यामागे काय होती कारणे?
योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्यामागे पक्षांतर्गत नाराजी होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, "राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणं होती, आता मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे."
पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करताना योगेश क्षीरसागर म्हणाले, "मी माझ्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले, मात्र मला विनाकारण विरोध केला गेला. "पक्षाचे पदाधिकारी नेमताना मला कुठेही विश्वासात घेण्यात आले नाही. याबाबत आपण पक्षाच्या वरिष्ठांशी देखील बोललो असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
विजयसिंह पंडितांकडे सूत्रे, क्षीरसागर नाराज!
योगेश क्षीरसागर यांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे अजित पवारांनी बीड नगर परिषदेची सूत्रे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे सोपवणे. या निर्णयावर योगेश क्षीरसागर यांनी तीव्र आक्षेप घेत आपली नाराजी बोलून दाखवली. ते म्हणाले, "बाहेरचे लोक बीडमध्ये येऊन वेगवेगळ्या निवडणुकीत प्रयोग करणं कायम बीडकरांनी हाणून पाडले आहे. हा प्रयोग सुद्धा बीडकर हाणून पाडतील, आपला स्वाभिमान जागा ठेवतील."
कमळ चिन्हावर निवडणूक लढणार
सोमवारी (१७ नोव्हेंबर) नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर योगेश क्षीरसागर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी स यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते भाजपच्या चिन्हावर बीड नगरपालिकेची निवडणूक लढणार आहेत.
काय म्हणाले योगेश क्षीरसागर?
योगेश क्षीरसागर म्हणाले, "बीड नगरपरिषदेचे जागा महिलेसाठी राखीव आहे. त्यानुसार कमळावर आम्ही निवडणूक लढू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एक युनिट म्हणून काम करू."
यापूर्वी योगेश क्षीरसागर यांचे वडील डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची बीड नगरपालिकेवर कित्येक वर्षे निर्विवाद सत्ता राहिली आहे.
योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठी बळकटी मिळाली असून, क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर (संदीप क्षीरसागर गट) असा सामना रंगण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications