उपसरपंच आत्महत्या: 'सख्ख्या बायकोपेक्षा जास्त प्रेम केले', मित्राला सांगितले धक्कादायक सत्य
प्रेमात झालेल्या विश्वासघातामुळे नैराश्यातून एका उपसरपंचाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (वय ५२) यांनी सोलापूर जिल्ह्यातील सासुरेगाव येथे एका नर्तकीच्या घरासमोर आपल्याच चारचाकी गाडीत बसून विष प्राशन करून जीवन संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रेम आणि आर्थिक व्यवहारातून झालेल्या फसवणुकीचे हे प्रकरण समोर आले आहे.

दीड वर्षांचे प्रेमसंबंध आणि वाढती मागणी
गोविंद बर्गे यांचे सोलापुरात एका कलाकेंद्रात काम करणाऱ्या पूजा गायकवाड नावाच्या नर्तकीसोबत गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या काळात गोविंद यांनी पूजावर लाखो रुपये उधळल्याचे उघड झाले आहे. त्यांनी तिला महागडा आयफोन, सोन्याचे दागिने आणि नाणी, बुलेट, शेतजमीन आणि सासुरेगावातील घर बांधून दिले होते. याशिवाय, त्यांनी तिला एक प्लॉटही घेऊन दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.
एवढे सर्व काही करूनही पूजाची पैशाची मागणी वाढतच गेली. तिने गोविंद यांच्याकडे गेवराईतील बंगला किंवा आणखी शेतजमीन आपल्या नावावर करण्याची मागणी केली. गोविंद यांनी हे करण्यास नकार दिल्यावर पूजाने त्यांच्यासोबत बोलणे अचानक बंद केले. त्यामुळे गोविंद नैराश्यात गेले.
मित्राकडे व्यक्त केले मन दु:ख
आत्महत्येपूर्वी गोविंद यांनी आपले जवळचे मित्र चंद्रकांत शिंदे यांना फोन करून आपली व्यथा सांगितली होती. त्यांनी शिंदे यांना सांगितले की, "मी हिला माझ्या सख्ख्या बायकोपेक्षाही जास्त जीव लावला. तिच्यासाठी कितीतरी पैसे, सोन्याचे दागिने आणि नाणी दिली. पण ती आता गेवराईचा बंगला किंवा शेतजमीन माझ्या नावावर कर, नाहीतर तुझ्यावर खोटी बलात्काराची केस करते, अशी धमकी देत आहे. ती मला खूप जास्त मानसिक त्रास देत आहे. गेल्या आठ दिवसांपासून तिने माझे इनकमिंग कॉलही बंद केले आहेत."
गोविंद यांनी पूजाच्या आईकडेही गयावया करून तिला बोलण्यासाठी विनंती केली होती, परंतु पूजाने कोणत्याही परिस्थितीत बोलण्यास नकार दिल्याने गोविंद पूर्णपणे निराश झाले.
आत्महत्येपूर्वीचा अखेरचा प्रयत्न
आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद बर्गे यांनी पूजाला भेटण्याचा शेवटचा प्रयत्न केला. ते पारगाव येथील तुळजाभवानी कलाकेंद्रात तिला भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी व्यवस्थापकाकडे पूजाला भेटण्याची परवानगी मागितली, परंतु ती भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी पूजाच्या मैत्रीणीला फोन करून तिला भेटण्याची विनंती केली. जेव्हा सर्व मार्ग बंद झाले, तेव्हा ते पूजाच्या घरी पोहोचले. मात्र, तरीही त्यांच्यामध्ये संवाद होऊ शकला नाही. या सर्व घटनांमुळे निराश होऊन त्यांनी शेवटी आपल्या गाडीत बसून विष प्राशन करून आत्महत्या केली.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, प्रेमप्रकरणातून फसवणूक आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पूजा गायकवाड आणि तिच्या कुटुंबाची भूमिका काय होती, हे तपासानंतरच स्पष्ट होईल. या घटनेमुळे प्रेम आणि विश्वासघात यातून निर्माण होणारे गंभीर परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.












Click it and Unblock the Notifications