Beed Accident : भीषण अपघाताने बीड हादरले, भरधाव कंटेनरने 6 जणांना चिरडले, चौघांचा जागीच मृत्यू!
Beed Accident News : बीड जिल्ह्याला आज सकाळी एका भीषण अपघाताने हादरवून सोडले. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाटा येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने सहा पादचाऱ्यांना चिरडले. या दुर्दैवी घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नेमके काय घडले?
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील सर्व पादचारी पेंडगाव येथे देवदर्शनासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी जखमींना त्वरित बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

अपघाताची कारणमीमांसा
अपघातानंतर बीड ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे आणि अपघागाचे नेमके कारण काय आहे, याचा तपास सुरू केला आहे.
काही दिवसांपूर्वी असाच घडला होता अपघात!
या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील भरधाव वेगाच्या धोक्याची जाणीव करून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच याच मार्गावर गढी उड्डाणपुलाजवळ अशाच प्रकारच्या अपघातात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता.
यामुळे, या मार्गावर वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या अपघातात मृत आणि जखमी झालेल्यांची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












Click it and Unblock the Notifications