Beed Accident News : गेवराईत भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू; उलटलेली कार बाजूला करताना कंटेनरने चिरडले
Beed Accident News : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे भरधाव कार दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातानंतर उलटलेली कार बाजूला करताना भरधाव ट्रकने चिरडल्याने तब्बल सहा जणांचा मृत्यू झाला, ही घटना काल मध्यरात्री 26 मे 2025 रोजी घडली.

गढी पुलाजवळ अपघात
गेवराई शहराजवळ गढी येथील पुलावर ही अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, मनोर करांडे, कृष्णा जाधव, बाळू अतकरे, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे अशी मृतांची नावे असून या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीवर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आधी कार दुभाजकाला धडकून अपघात
बीडवरून एक कार गेवराईकडे जात होती; पण पाऊस चालू असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. याचवेळी गेवराईचे तरुण बीडकडे जात होते. त्यांना हा अपघात दिसल्यावर त्यांनी क्रेनच्या साह्याने जीप बाजूला करण्यासाठी मदत करणे सुरू केले. त्यावेळी भरधाव कंटेनरने या मदत करणाऱ्या तरुणांना चिरडले व पुढे निघून गेला. अपघाताचा आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले व त्यांनी तरुणांना तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत या तरुणांचा मृत्यू झाला.
सुसाट कंटेनर आला अन् सहा जणांचा बळी घेतला
उलटलेली कार बाजूला घेण्याचा प्रयत्न सहा ते सात जण करत होते. त्याचवेळी सुसाट वेगाने आलेल्या ट्रकने या लोकांना धडक दिली. हा अपघात भीषण होता, यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. या घटनेनंतर घटनास्थळी आणि जिल्हा उपरुग्णालयात परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली.
दरम्यान, या अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी या रस्त्यावर झाली. येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहनांची झालेली कोंडी सोडवली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, गेवराईत घडलेल्या ही घटना धडकी भरवणारी होती.












Click it and Unblock the Notifications