अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली!
Baramati By Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शक्तिशाली केंद्र असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे समीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पूर्णपणे बदलले आहे. या रिक्त झालेल्या जागेसाठी आता पोटनिवडणुकीची (Baramati Assembly By-election) तयारी प्रशासकीय पातळीवर वेगाने सुरू झाली असून, राजकीय वर्तुळातही हालचालींना वेग आला आहे.
10 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून मतदारसंघाची अंतिम मतदार यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली आहे. ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्यानंतर ही यादी अंतिम करण्यात आली.

मतदारसंघाची आकडेवारी:
पुरुष मतदार: १,९३,४९६
महिला मतदार: १,९०,२७१
इतर: २४
एकूण मतदार संख्या: ३,८३,७६७
विशेष म्हणजे, १ जानेवारी २०२६ पर्यंत ज्यांनी नाव नोंदणी केली आहे, त्यांनाच या पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
सुनेत्रा पवार: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि उमेदवार
अजितदादांच्या निधनानंतर बारामतीची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सांभाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी नुकतीच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. भारतीय संविधानाच्या कलम १६४(४) नुसार, विधिमंडळाचे सदस्य नसतानाही त्या या पदावर राहू शकतात, मात्र ६ महिन्यांच्या आत त्यांना निवडून येणे अनिवार्य आहे. त्यामुळेच बारामतीची ही पोटनिवडणूक त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
कोण आहेत सुनेत्रा पवार? (Sunetra Pawar Profile)
सुनेत्रा पवार यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६३ रोजी धाराशिव येथील तेर येथे झाला. त्यांना राजकीय वारसा माहेरूनच (माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी) लाभला होता. १९८५ मध्ये अजित पवारांशी विवाह झाल्यानंतर त्यांनी काटेवाडीतून सामाजिक कार्याला सुरुवात केली. 'ग्रामस्वच्छता' चळवळीद्वारे त्यांनी काटेवाडीला राज्यात प्रथम क्रमांकावर आणले. त्यांच्या कार्याची दखल घेत सार्क देशांच्या साकोसान परिषदेत त्यांना सहा राष्ट्रप्रमुखांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली.
रोजगार आणि आरोग्य
'एनव्हायर्नमेंट फोरम ऑफ इंडिया'च्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण, आरोग्य (मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅन्सर जागृती) क्षेत्रात मोठे काम केले आहे. बारामती टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला.
"लग्नानंतर अजित पवारांना शेती आणि पोल्ट्री व्यवसायात साथ देण्यापासून ते राजकारणात पडद्यामागून सल्लामसलत करण्यापर्यंत सुनेत्रा वहिनींनी नेहमीच खंबीर भूमिका बजावली आहे."
निवडणूक 'बिनविरोध' होणार का?
राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) प्रयत्न ही निवडणूक बिनविरोध करण्याचा आहे. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि सुनेत्रा पवारांचे सामाजिक कार्य पाहता, इतर पक्ष आपला उमेदवार उभा न करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडी किंवा इतर विरोधकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. निवडणूक आयोग लवकरच या पोटनिवडणुकीची अधिकृत तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बारामतीमध्ये राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळेल.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता! -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?








Click it and Unblock the Notifications