Baramati Bypoll 2026 : सुनेत्रा पवार रिंगणात, पण 'बिनविरोध'ची शक्यता धूसर? जाणून घ्या नेमकं समीकरण
Baramati bypoll 2026 news : राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) या जागेसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर केली असली, तरी ही निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची, याबाबत आता सस्पेन्स निर्माण झाला आहे.

सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाकडून सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर या मतदारसंघाची जबाबदारी कुटुंबाकडेच राहावी, यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
शरद पवार गटाची मवाळ भूमिका, पण...
या निवडणुकीत सर्वात मोठी अपडेट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने बारामतीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षांतर्गत बैठकीत ही निवडणूक न लढवण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवार यांनी शड्डू ठोकला होता, मात्र अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर सहानुभूती आणि राजकीय शिष्टाचार म्हणून उमेदवार न देण्याची भूमिका शरद पवार यांच्या पक्षाने घेतली आहे.
धनगर समाजाची नाराजी ठरणार का अडथळा?
शरद पवारांच्या पक्षाने माघार घेतली असली तरी बारामतीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे धनगर समाजातील नाराजी. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या संलग्न रुग्णालयाला अजित पवारांचे नाव दिल्याने समाजाचा एक गट आक्रमक झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयावर नाराज असलेल्यांपैकी कोणीतरी अपक्ष किंवा इतर संघटनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करत आहे. जर असा अर्ज दाखल झाला, तर बारामतीला मतदानाला सामोरे जावे लागेल.
पोटनिवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम
केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांसाठी एकाच वेळी कार्यक्रम जाहीर केला आहे:
- निवडणुकीची अधिसूचना: ३० मार्च २०२६
- उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत: ६ एप्रिल २०२६
- अर्जांची छाननी: ७ एप्रिल २०२६
- अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ एप्रिल २०२६
- मतदानाची तारीख: २३ एप्रिल २०२६
- निकाल (मतमोजणी): ४ मे २०२६
राहुरीमध्ये मात्र चुरस अटळ
बारामतीत शरद पवार गट शांत असला तरी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र चित्र वेगळे आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे राहुरीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत.
एकंदरीतच, बारामतीत सुनेत्रा पवारांचा मार्ग सुकर वाटत असला, तरी स्थानिक नाराजी आणि अपक्ष उमेदवारांची भूमिका 'बिनविरोध' निवडणुकीच्या स्वप्नात अडथळा ठरू शकते. आता सर्वांचे लक्ष 9 एप्रिलकडे लागले आहे, जेव्हा अर्ज मागे घेण्याची मुदत संपेल.












Click it and Unblock the Notifications