पुण्याचा 'बिहार' होतोय का? अमोल बालवडकरांचा घायवळसोबतचा व्हिडिओ भाजपने केला शेअर
पुण्याच्या राजकारणात सध्या विकासाच्या मुद्द्यांपेक्षा 'टोळीयुद्धा'ची आणि 'गुन्हेगारी कनेक्शन'ची चर्चा अधिक रंगू लागली आहे. बाणेर-बालेवाडी-सुस या सुसंस्कृत भागाचे प्रतिनिधित्व करू पाहणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार अमोल बालवडकर यांचा कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबत मद्यपार्टी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या 'डर्टी पिक्चर'मुळे मतदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात वारंवार गुंडांचा उल्लेख होत असल्याने आता गुंडांच्या हाती सत्ता जाणार का?" असा जळजळीत सवाल उपस्थित केला जात आहे.

काय आहे त्या 'व्हायरल' व्हिडिओत?
भाजपचे अधिकृत उमेदवार लहू बालवडकर यांनी आपल्या 'X' (ट्विटर) हँडलवरून हा खळबळजनक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमोल बालवडकर हे कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासोबत बसून मद्यप्राशन करताना दिसत आहेत. ज्या निलेश घायवळच्या नावाचा पुण्यात दरारा आहे आणि ज्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा गुंडासोबत अमोल बालवडकर पार्टी करत असल्याचे लहू बालवडकरांनी शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे.
लहू बालवडकरांचा 'नैतिकते'चा प्रहार
हा व्हिडिओ पोस्ट करताना लहू बालवडकर यांनी धारदार शब्दांत अमोल बालवडकरांवर टीका केली आहे. ते म्हणाले की,
"बाणेर-बालेवाडी-सुस सारख्या सुशिक्षित परिसरातील नागरिकांना गोंधळ किंवा गुन्हेगारी वृत्तीचे नाही, तर जबाबदार नेतृत्व हवे आहे. जे लोक भाषणातून नैतिकतेचे धडे देतात, त्यांच्या कृतीतून कोणती मूल्ये जपली जात आहेत, हे आता जनतेसमोर आले आहे. पुण्याची संस्कृती अशा विसंगत वर्तनाला कधीच मान्यता देणार नाही."
सुसंस्कृत पुण्याची ओळख ही शांतता, विचारशीलता आणि जबाबदार वर्तनाची आहे. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकांना हीच अपेक्षा असते.
— Lahu Balwadkar (@LBalwadkar) January 9, 2026
काल रात्रीपासून सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात एवढेच नमूद करावेसे वाटते की, राजकारणात टीका… pic.twitter.com/A0xIZdZnQt
अमोल बालवडकरांचा बचावात्मक पवित्रा
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अमोल बालवडकर यांनी "हा व्हिडिओ ॲनिमेटेड किंवा बनावट असू शकतो" असा दावा करत पोलिसांत तक्रार केल्याचे सांगितले आहे. मात्र, "व्हिडिओ खरा असो वा खोटा" असे म्हणत त्यांनी स्वतःच साशंकता निर्माण केली असल्याची चर्चा रंगत आहे. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतःचा बचाव करण्याऐवजी उलट २०१९ मध्ये भाजप नेत्यांनीच घायवळची मदत घेतल्याचा जुना आरोप करून विषय भरकटवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मतदारांच्या मनात धाकधूक
एकीकडे बापू नायर असो, गजानन मारणे असो की आंदेकर कुटुंब गुन्हेगारांचा राजकारण्यांसोबत असलेला संबंध पाहता सुशिक्षित मतदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकीकडे 'सुसंस्कृत पुणे' च्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे कुख्यात गुंडांसोबत रहायचे, असा दुटप्पी चेहरा असलेल्या नेत्यांबद्दल नागरिक आता संताप व्यक्त करू लागले आहेत.
निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात 'व्हिडिओ वॉर'ने अमोल बालवडकरांची कोंडी केली आहे. या व्हिडिओची सत्यता समोर येईलच. मात्र या वादाचा थेट फटका अमोल बालवडकर यांना बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.












Click it and Unblock the Notifications