वांद्रे पुर्वमध्ये वरुण सरदेसाई यांची बाजी, 11 हजार मतांनी साकारला विजय
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात उध्दव ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांनी 11 हजार 365 मतांनी झीशान सिद्दिकी यांचा पराभव केला आहे. उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक वरुण सरदेसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे नेते असलेले दिवंगत बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झीशान सिद्दिकी यांच्या उमेदवारीमुळे ही लढत रंगतदार झाली होती.
वांद्रे पूर्व मतदारसंघातच उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान येते. हा मतदारसंघ 2009 आणि 2014 अशा सलग दोन वेळा शिवसेनेने जिंकून घेतला होता. मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या असलेल्या वांद्रे पूर्व मध्ये शिवसेनेचे तत्कालीन आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत यांनी चांगली बांधणी केली होती. 2014 मध्ये आमदार बाळा सावंत यांचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी पोट निवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत तृप्ती सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव केला होता.

2019 च्या निवडणुकीत तृप्ती सावंत यांचे तिकीट कापून माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली तर काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी दिली होती. तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले आणि झिशान सिद्दिकी हे मुस्लिम बहुल मतांवर विधानसभेत गेले होते.
आता चित्र बदलले असून झिशान सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. झीशान यांचे वडील काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. विद्यमान आमदार असल्यामुळे अजित पवार यांनी झीशान यांना संधी दिली आहे तर उद्धव ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली. 2019 प्रमाणेच तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली असून त्यामुळे ही लढत तिरंगी झाली होती.
सरदेसाई आणि झीशान सिद्दिकी हे प्रमुख प्रतिस्पर्धी असले तरी दोन्ही उमेदवारांची मदार बेहराम पाडा परिसरातील एक गठ्ठा मुस्लिम मतांवर होती. तसेच बाळा सावंत यांना मांडणारा वांद्रे पूर्व मधील मोठा वर्ग तृप्ती सावंत यांना मतदान करील असाही अंदाज होता. तसेच उद्धव ठाकरे गटाच्या पुरोगामी विचारधारेमुळे वांद्रे पूर्व मतदार संघातील मराठी मतदार मोठ्या संख्येने तृप्ती सावंत यांच्या पारड्यात आपले दान टाकेल अशी अपेक्षा होती. " कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे चुकून निवडून आले तर त्यांच्यासमोर मी उभा असणार आहे," असे विधान मुस्लिम समुदायाच्या बैठकीत वरुण सरदेसाई यांनी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला होता. मुस्लिम मतदार आणि मराठी मतदार पुण्याच्या पारड्यात बहुसंख्येने मतदान करतील यावरच या मतदारसंघाचे भविष्य अवलंबून होते.












Click it and Unblock the Notifications