बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडून दखल, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार
बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचाराच्या घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान अत्याचाराच्या या घटनेविरोधात मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी साडे सहा वाजल्यापासून हजारों पालक आणि नागरिकांनी शाळेबाहेर ठिय्या देत तसेच रेल रोको आंदोलन केले यामुळे लोकल व मेल-एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुख्यमंत्री शिंदेनी माध्यमांशी बोलताना सागितले की, या संस्थाचालकाचीही चौकशी केली जाणार असून, दोषी आरोपींविरोधात कठोर कारवाई करणार जाणार आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासंदर्भात पोलिस आयुक्तांना आदेश दिले आहेत.
नागरिकांनी लोकल, रेल्वे रोखल्या
हे प्रकरण समोर आल्यानंतर बदलापुरातील नागरिक आता नागरिक प्रचंड संतापले आहेत. ज्या शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाले, त्या शाळेच्या बाहेर महिला तसेच पुरुष मोठ्या संख्येने जमले आहेत. नागरिक येथे घोषणाबाजी करत आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
सात दिवस झाले तरी या प्रकरणावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेदेखील नागरिक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आहेत. लोक बदलापूरच्या रेल्वे स्टेशनवर जमले असून त्यांनी लोकल ट्रेन रोखल्या आहेत. रेल्वे ट्रॅकवर उतरून नागरिक जोरदार घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.
काय आहे प्रकरण
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत एका सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला आहे. हे प्रकरण सात दिवसांनी समोर आले आहे. चिमुकल्यांच्या पालकांनी याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवले. सोमवारी शाळेने माफीनामा जाहीर केला याप्रकरणी शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबीत करण्यात आले.
मंगळवारी पालक आणि सजग नागरिकांनी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी पालक आणि बदलापुरकर शाळेच्या बाहेर जमले आणि आंदोलनाला सुरुवात झाली. यात हजारो बदलापूरकर सामिल झाले.












Click it and Unblock the Notifications