Badlapur Encounter:बदलापूर एनकाऊंटर प्रकरणात मोठी घडामोड, मृत अक्षयचे वडील बेपत्ता, ठावठिकाणा लागेना
Badlapur Encounter Case Dead Akshay Shinde's Father Missing : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि एनकाऊंटर प्रकरणात पोलिसांचा सहभाग असेल तर गुन्हा नोंदवण्याचे आदेश काल 7 एप्रिल 2025 रोजी दिले. काल यासंदर्भात सुनावणी पार पडली. यादरम्यानच एनकाऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या अक्षय शिंदे याचे वडील बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. त्यांचा कुणाशी संपर्क होऊ शकलेला नाही अशी माहिती आता समोर आली आहे.
बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेचा एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. दरम्यान, या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरच अक्षय शिंदेचे पालक गायब झाले आहेत. त्यांच्या राहत्या घराला कुलूप लागलेले आढळून आले आहे. अक्षयचे पालक काही काळ अंबरनाथमध्ये त्याच्या मावशीकडे राहत होते, मात्र आता तिथूनही ते अचानक निघून गेल्याचे वृत्त आहे.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयात दाद मागण्यासाठी शिंदे यांचे पालकांनी वकील अमित कटरनवरे यांची नेमणूक केली होती. मात्र, नंतर कोर्टात त्यांनी केस लढण्याची इच्छा नसल्याचे सांगितले असे बोलले जाते. नवराष्ट्रने यासंदर्भात वृत्त दिले आहे. दरम्यान, शिंदे यांचे पालक वकिलांशीही संपर्कात राहिलेले नाहीत तसेच ते गेल्या दीड महिन्यांपासून ते नेमके कुठे आहेत, ते कसे आहेत याची कोणालाही काहीही माहिती नाही.
पोलिसांवर गुन्हा दाखल करा- कोर्टाचे आदेश, राज्य सरकारला दणका
बदलापूरमधील एका शाळेतील लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा बनावट एन्काऊंटर प्रकरणात आज प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती. त्यावर पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश या आधीच न्यायालयाने दिले होते. आता या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता राज्य सरकारनं केलेली मागणी फेटाळण्यात आली.
काय आहे बदलापूर प्रकरण?
13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 च्या दरम्यान बदलापुरातील शाळेतील दोन लहान मुलींबरोबर दृष्कृत्य केल्याची घटना घडली होती. परिणामी त्यांना गुप्तांगात वेदना होऊ लागल्या. या मुलींनी यासंदर्भात त्यांच्या पालकांना कळवलं. पालकांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी केल्याने हा प्रकार उजेडात आला. परंतु, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरही या प्रकरणी कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचा दावा करण्यात आला होता.
तारखेनुसार अपडेट
- 16 ऑगस्टच्या रात्री या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला.
- 17 ऑगस्ट रोजी अक्षय शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली.
- 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायलयीन प्रक्रीया सुरु होतीय
- 20 ऑगस्ट - चार वर्षीय मुलींवर या नराधमाने अत्याचार केल्याचा अक्षयवर आरोप होता. या प्रकरणी गुन्हा दाखल होण्यास उशीर झाल्यानेही बदलापुरात 20 ऑगस्ट रोजी आंदोल आंदोलन पेटले होते.
- 23 सप्टेंबरला पोलिस एनकाऊंटरमध्ये मृत्यू.
असा झाला होता एनकाऊंटर
तळोजा कारागृहातून ट्रान्झीट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये मोरे यांच्या पोटाला व मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही.
यानंतर सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला. अक्षय शिंदेला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications