शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मोठ्या नेत्याने सोडला पक्ष
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुर्राणी यांनी व्यक्त केली भूमिका
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना दुर्राणी यांनी देशातील आणि राज्यातील सद्यःस्थितीवर भाष्य केले. "राजकीय परिस्थिती बदलत असून, अल्पसंख्याक समाजाला डावलले जात आहे," असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, "देशात आता भाजप आणि काँग्रेस हे दोनच मुख्य पक्ष राहणार आहेत."
दुर्राणी यांनी काँग्रेसला बळकट करण्याची गरज व्यक्त केली. "जाती-धर्माच्या राजकारणाने लोकांच्या भावना भडकवून फार काळ सत्तेत राहता येत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी काम करणे महत्त्वाचे आहे," असे सांगत त्यांनी परभणी जिल्ह्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवण्याचे आश्वासन दिले.
अमित देशमुख यांनी केले स्वागत
बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रवेशावर बोलताना काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. "मराठवाड्याच्या मातीतील एक सक्षम नेतृत्व आज आमच्या पक्षात सहभागी झाले आहे," असे ते म्हणाले. "मी त्यांना अनेकदा पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला होता, पण आता योग्य वेळ जुळून आली आहे. 'देर आये दुरुस्त आये'," असे म्हणत त्यांनी समाधान व्यक्त केले. काँग्रेस पक्ष जनमताला महत्त्व देत असून, त्यामुळेच पक्षाचे बळ वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.












Click it and Unblock the Notifications