Baba Siddiqui :जेव्हा EDने बाबा सिद्दीकींची जप्त केली होती 462 कोटींची मालमत्ता! 'हे' ते प्रकरण वाचा
Baba Siddiquis assets : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीक यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना तीन गोळ्या लागल्या, त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी आपल्याला धक्का बसला असे म्हटले आहे.
बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे ही प्रक्रीया पार पडणार आहे. बाबा सिद्दीकी मुंबईतील मोठे नाव आणि शरद पवार असो की अजित पवार यांच्यासोबत सक्रीय राजकारणातील चर्चेत असलेले नाव होते. त्यांचे बाॅलीवूडमध्येही चांगले संबंध होते. त्यांच्या ईफ्तार पार्टीच्या बातम्याही व्हायच्या. एकाएकी हत्या झाल्यानंतर त्यांच्याशी संबंधित माहिती पुढे येत आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर काल रात्री वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळील निर्मल नगरमधील सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी याच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी हे तीन वेळा आमदार होते. राजकीय क्षेत्रातील दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते. ते सतत हसतमुख असायचे.
मनी लाँडरींगमध्ये कारवाई
2018 मध्ये सक्तवसुली संचलनालय अर्थात इडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची 462 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. ही मालमत्ता वांद्रे पश्चिम इथली होती आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) इडीने जप्तीची कारवाई केली होती.
काय होते प्रकरण
बाबा सिद्दीकी यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे अध्यक्ष म्हणून 2000 ते 2004 या चार वर्षांच्या कालावधीत कामकाज पाहीले. पिरॅमिड विकासकांना वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) विकासासाठी मदत केली का याचा तपास केला जात होता. या कथित घोटाळ्याची रक्कम दोन हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते.
2000 कोटी रुपयांचा झोपडपट्टी घोटाळा करणारी कंपनी बाबा सिद्दीकी यांची शेल कंपनी असल्याचा कयास ईडीने तपासादरम्यान त्यावेळी व्यक्त केला होता. हा गुन्हा मुंबई पोलिसांनी मार्च 2014 मध्ये नोंदवला होता. एका रहिवाशाने 2012 मध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, मुंबई पोलिसांनी SRA प्रकल्पातील घरांच्या वाटपात कथित अनियमिततेप्रकरणी सिद्दीकी आणि इतर 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
यामुळे बाबा सिद्दीकीची हत्या?
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुर्नविकास प्रकरण हे देखील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कारण असू शकते असा कयास काहीजणांचा आहे. कारण बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांी काही दिवसांपूर्वी झोपडपट्टी पुर्नरविकासाला विरोध करत होता.












Click it and Unblock the Notifications