छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत सर्वाधिक इच्छुक! हरिभाऊ बागडे राज्यपाल आता फुलंब्रीत कुणाला उमेदवारी
Aurangabad Election : विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाले. त्यामुळे आता बागडे यांची जागा घेण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहे.
फुलंब्री विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. बागडे आता राज्यपाल झाल्याने या ठिकाणी भाजपकडून ते उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या ठिकाणी तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने ते प्रचारालाही लागले आहेत. पण, उमेदवारी मात्र एकालाच मिळणार आहे.

भाजपकडून इच्छुकांमध्ये बाजार समितीचे चेअरमन राधाकिसन पठाडे, माजी महापौर बापू घडमोडे, फुलंब्री बाजार समितीच्या चेअरमन अनुराधा चव्हाण, बाजार समितीचे सदस्य रामबाबा शेळके, रामूकाका शेळके, विजय औताडे, फुलंब्रीचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांची नावे चर्चेत आहेत.
काँग्रेसही देणार नवा उमेदवार
या ठिकाणी कॉंग्रेसकडून डॉ. कल्याण काळे उमेदवार असत. पण, काळे आता खासदार झाले. त्यामुळे कॉंग्रेसकडून या ठिकाणी नवा उमेदवार असेल हे निश्चित आहे. दरम्यान, महविकास आघाडीत हा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटणार की ठाकरे गटाला हेही औत्सुक्याचे आहे. पण, छत्रपती संभाजीनगर शहरातील तीनही मतदारसंघ ठाकरे गटाला तर फुलंब्री कॉंग्रेसला मिळेल अशी शक्यता आहे.
शिवसेना किती जागा लढविणार?
जिल्ह्यात कन्नड वगळता पैठण, वैजापूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि मध्य या मतदारसंघांतील आमदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे ५ मतदारसंघांसह कन्नड मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्या पैठणमधून विलासबापू भुमारे इच्छुक आहेत.
ज्येष्ठ नेते संदीपान सुमारे खासदार झाल्याने विधानसभेत विलासबापू यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. सिल्लोडमध्ये पुन्हा एकदा अब्दुल सत्तार उमेदवार असणार आहेत, हेही निश्चित आहे. मात्र, जागावाटपाचा अंतिम निर्णय हा वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications