..मग आम्हालाही मर्यादा सोडावी लागेल! या नेत्याचा मनोज जरांगेंना थेट इशारा
मुंबई - जोपर्यंत तुम्ही समाजाच्या आरक्षणाच्या भुमिकेबद्दल बोलत आहात, तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण ज्यावेळी मर्यादा सोडून राजकीय भाष्य करताहेतत्यावेळी आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना दिला. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
ते चकार शब्द काढत नाही..
ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिले नाही, किंबहूना ज्यांनी मिळालेले आरक्षण घालवले, त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत, उलट ज्यांनी दिले त्यांच्या विरोधातच जरांगे का बोलतात ? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.

मनोज जरांगेंना विसर पडला
आशिष शेलार म्हणाले, मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण समर्थन असून किंबहुना मराठा समाजाला आरक्षणा देण्याची भूमिका विरोधी पक्षाने केवळ भाषणात मांडली त्याचं कायद्यात रूपांतर करण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केले. जरांगे पाटील यांना त्यांचा विसर का पडलाय?
मनोज जरांगेना थेट इशाराच
जरांगे पाटील जोपर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेबद्दल बोलत आहेत, तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, पण ज्या वेळेला ती मर्यादा सोडून ते राजकीय भाष्य करतायेत त्यावेळेला आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील, असा थेट इशारा आशिष शेलार यांनी दिला.
मराठा समाज म्हणजे जरांगे नाहीत
जरांगे पाटील हे या आंदोलनकर्त्यांच्या मागणीचा नेतृत्व करतात ते योग्यच, पण याचा अर्थ सकल मराठा समाज म्हणजे जरांगे पाटील आहेत असं मानण्याचे कारण नाही. म्हणून जरांगे पाटील म्हणजेच सगळे मराठा आणि सगळेच मराठा दावणीला बांधले जातील, हा जर त्यांचा समज झाला असेल तर तो त्यांनी दुर करावा, हे त्यांना नम्रपणे सांगतो असेही त्यांनी म्हटले आहे.
एक विरुद्ध तीन असा सामना
एकीकडे मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्याचे काल जालन्यातील अंतरवाली सराटी येथे घोषित केले. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. तर दुसरीकडे भाजपने जरांगेना घेरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. प्रसाद लाड, प्रविण दरेकर आणि आशिष शेलार हे तिघे दिग्गज नेते भाजपकडून जरांगे यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक असतानाही भाजप मनोज जरांगे यांच्याशी दोन हात पुढे करीत आव्हान देत आहे. त्यामुळे आता भाजप वेगळी खेळी करीत तर नाही ना अशी शंकाही येत असल्याचे अनेकांना वाटत आहे.












Click it and Unblock the Notifications