लाडकी बहीण योजनेचा अर्ज सबमीट होईना..! अनेकांना चिंता, महिलांनी अजित पवारांसमोर मांडली व्यथा
मुंबई - राज्यात लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. कुणाचाही अर्ज नव्याने अपलोड होत नसून या अडचणींची तक्रार कुठे करावी हाच प्रश्न समोर आला आहे, अर्ज सादर करण्याची मुदत संपते की, काय अशी भितीही काहींना वाटत असल्याने पात्र असूनही योजनेचा लाभ मिळतो की, नाही ही चिंताही काहींना वाटत आहे.
हाच धागा पकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्ज सबमीट होत नाही, स्वीकारले जात नसल्याची तक्रार करत महिलांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत.

नेमका प्रकार काय?
अनेक महिला भगिनी लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नारीशक्ती अॅपवर त्या आपली माहिती अपलोड करीत आहेत. पण ज्यावेळी फार्म सबमीट करण्याची वेळ येत आहे. तेव्हा तुमचा अर्ज सबमीट करु शकत नाही अशी सुचना अॅपवर दिसत आहे. यामुळे हजारो लाभार्थी महिलांचा हिरमोड होत आहे.
अनेकजणी योजनेपासून वंचित
ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यातही अडचणी येत असल्याने अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट असल्याने या धर्तीवर अनेकजण ही तांत्रिक अडचण दूर कधी होईल याची प्रतिक्षा करत आहेत.
अजित पवारांसमोर तक्रारी...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज अंमळनेर येथील एका शेतबांधावर जाऊन संवाद साधला. या संवादात महिलांना बेरोजगारी आणि लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारींचा पाढा वाचला. जेव्हा अजित पवारांनी माझी लाडकी बहीण योजना आणली. त्या योजनेचा फॉर्म भरला का? असा प्रश्न केला त्यावेळी महिलांनी भरलाय पण तो स्वीकारला जात नसल्याचे सांगितले. स्वीकारला गेला नाही? याची तुम्ही पूर्ण खात्री केली का, असे म्हटले असता हो कालच फार्म पुर्ण भरला होता पण स्वीकारला गेला नाही हे महिलेने सांगितले.
अर्ज का स्वीकारला गेला नाही तपासा
अजित पवार यांनी महिलांशी संवाद साधल्यानंतर आमदार अनिल पाटील यांना तुमचा स्वीय सहायक पाठवा आणि या महिलेचा अर्ज का स्वीकारला गेला नाही, याची चौकशी करा असे सांगितले.
अर्ज स्वीकार होईना...
1 जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु असून त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार आहे. परंतु, अर्ज भरण्यासाठीच्या अॅपवर अर्ज स्वीकारले जात नसून संकेतस्थळावर सातत्याने तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज प्रक्रिया रखडली आहे. अॅपवर अर्जनोंदणी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आली असून संकेतस्थळावरून अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे. परंतु, संकेतस्थळावरूनही वेगाने प्रक्रिया होत नाही ही प्रमुख समस्या आहे.












Click it and Unblock the Notifications