संतोष देशमुख प्रकरणाची बीडमध्येच पुनरावृत्ती; टोळक्याच्या हल्ल्यात चौघे गंभीर जखमी, काय झाले? वाचा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आला. हे प्रकरण अजूनही शांत झालेले नाही. मात्र त्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे एक-एक प्रकरण रोज समोर येत आहे. आता दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २७ एप्रिलला आष्टी तालुक्यातील वाटेफळ येथे आणखी एक असेच अमानुष मारहाणीचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात नऊ जणांनी दोघांना बेदम मारहाण केली. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय झाले?
२७ एप्रिलला रुईछत्तीशीचा बाजार आटोपून प्रशांत बापू चौधरी (वय २२, रा. खुंटेफळ) हा त्याचा चुलत भाऊ भाऊसाहेब बाळासाहेब चौधरी याच्यासोबत आणखी एका मित्राची वाट पाहत वाटेफळ येथील बसस्टॅन्डवर थांबला होता. यावेळी मित्र येईपर्यंत या दोघांनी बस स्टॅन्डच्या आडोशाला एका ठिकाणी लघुशंका केली. त्यावेळी तेथील नारायण कोळेकर यांनी त्यावर आक्षेप घेतला. येथे बायका असतात, येथे लघुशंका करु नका, असे त्यांनी या दोघांना सांगितले. त्यानंतर शिविगाळ करण्यास सुरुवात केली. आपली चूक झाली हे लक्षात आल्यावर चौधरी बंधूंनी नारायण व त्याचा भाऊ बाळासाहेब कोळेकर यांची माफी मागितली. मात्र प्रकरण वाढल्याने प्रशांत व भाऊसाहेब चौधरी यांना मारहाण करण्यात आली.
जमावाने केला हल्ला
हे प्रकरण येथेच थांबले नाही. त्यानंतर काही वेळाने नारायण कोळेकर याने सोमनाथ चितळकर याला बोलावून घेतले. सोमनाथ याच्यासोबत सुशील चितळकर, धरम महारनोर, सोन्या उल्हारे, अजय साबळे, दुर्गेश साबळे तसेच अनोळखी सात-आठ जण आले. त्यांच्याकडे लोखंडी गज, राँड, लाठ्या, काठ्या होत्या. या टोळक्याने प्रशांत व त्याचा भाऊ भाऊसाहेब याला बेदम मारहाण केली.
दोन गटांत राडा
हा प्रकार सुरु असताना प्रशांतने आरडाओरडा केल्यानंतर तेथे त्याचा चुलत भाऊ वेदांत चौधरी व मित्र दीपक कराळे हे आले. मात्र टोळक्याने या दोघांनाही बेदम मारले. वेदांत चौधरी याला राँडने डोक्यावर, पाठीवर मारण्यात आले. या मारामारीत नारायण कोळेकर यांच्या पत्नीने दगडाने हल्ला करुन वेदांतचा मोबाईल फोडला. तसेच बाळासाहेब कोळेकर याने प्रशांतची अंगठी बळजबरी काढून घेतली.
पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणानंतर टोळक्याने खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना बोलावले अशी तक्रार चौधरी यांनी केली. पोलिसांनी घटनास्थळाची स्थिती पाहून तातडीने प्रशांत, भाऊसाहेब, वेदांत व दीपक यांना अहिल्यानगर सिव्हिल हाँस्पीटलमध्ये दाखल केले. प्रशांतच्या तक्रारीवरुन नंतर या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेवरुन संतोष देशमुख प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरु झाली. त्या प्रकरणात व या प्रकरणात बरेच साम्य असल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.












Click it and Unblock the Notifications