त्रिभाषा सूत्रावर भाजपचा आरोप फोल; अनिल परब यांनी पुराव्यानिशी स्पष्टता मांडली
राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र सक्तीने लागू करण्याच्या मुद्द्यावरून भाजपकडून सातत्याने आरोप केले जात आहेत की, हे धोरण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालं होतं. मात्र या दाव्याला आता ठोस उत्तर देत ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपचा दावा फेटाळला आहे.

माशेलकर समितीचा अहवाल आणि पुढची प्रक्रिया
अनिल परब यांनी स्पष्ट केले की, ठाकरे सरकारच्या काळात रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या समितीचा अहवाल 2022 च्या जानेवारी महिन्यात मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. मात्र, यानंतर ठाकरे यांनी तो अहवाल अभ्यासासाठी मुंबई आणि पुणे विद्यापीठातील तज्ज्ञांच्या समितीकडे पाठवण्याचे आदेश दिले होते. त्या अभ्यासगटाची पुढे एकही बैठक झाली नाही, यामुळे त्रिभाषा धोरणासंबंधी कोणताही ठोस निर्णय झालाच नव्हता, असं परब यांनी ठामपणे सांगितलं.
"हिंदी सक्तीचा निर्णय आम्ही घेतला नाही" - अनिल परब
शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीवर भाजपकडून थेट ठाकरे सरकारवर बोट ठेवण्यात आलं असलं तरी परब यांनी दावा केला की, "या विषयावर कुठेही, कधीही कोणतीही चर्चा ठाकरे सरकारमध्ये झाली नव्हती. ना मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला होता, ना त्यावर अमल करणारा कोणताही शासकीय निर्णय (GR) काढण्यात आला होता."
फडणवीस सरकारनेच जारी केला GR?
याउलट, अनिल परब म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर 22 एप्रिल रोजी त्रिभाषा सूत्रावर अंमलबजावणी करणारा GR काढण्यात आला. त्यामुळे भाजपने ठाकरे सरकारवर केलेले आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला. "माझ्याकडे संपूर्ण तारखा आणि कागदपत्र आहेत," असं परब यांनी ठामपणे सांगितलं.
ठाकरे-राज ठाकरे यांचा एकत्रित मोर्चा
त्रिभाषा धोरणाविरोधात येत्या 5 जुलै रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र मोर्चा काढणार आहेत. या ऐतिहासिक आंदोलनामुळे 2006 नंतर प्रथमच दोन्ही ठाकरे बंधू एका व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने 'त्रिभाषा सूत्र' उद्धव ठाकरे यांच्या काळातच मंजूर झालं, असा दावा केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
मात्र आता अनिल परब आणि बाळा नांदगावकरांनी पुराव्यानिशी भाजपचा प्रचार उघड केला आहे, त्यामुळे यापुढील राजकीय चर्चा आणखी गती घेण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications