'ज्यांना आपल्या मुलीला CM करायचे ते लोक तुम्हाला'..अमृता फडणवीसांचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला
Amrita Fadnavis on Sharad Pawar Uddhav Thackeray over CM post : ज्यांना आपले घर भरायचे आहे. ज्यांना मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे, पॉवरमध्ये ठेवायचे आहे असे लोक तुमच्या मदतीला येणार नाहीत. लोकांना पुढे नेणारे असे उमेदवार नेते निवडून आले पाहिजेत अशी टीका अमृता फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवारांवर केला. अमृता फडणवीस यांनी नागपूर येथील लाडकी बहीण मेळाव्यात जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी भाजपाचे सरकार महिलांसाठी अनेक योजना आणून त्यांना फायदा मिळवून देत आहे. लाभार्थी महिलांना त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले.
अमृता फडणवीस म्हणाल्या की, महाराष्ट्र पुरोगामी राहण्यासाठी महिलांना पुढाकार घ्यावा, महिलांनी स्वत:सोबत दुसऱ्यांना देखील उभे केले तर कुटुंबाला आधार मिळेल तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी होईल. महाराष्ट्रात अनेक विकासकामे झाली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर , रोजगार यामुळे सुबत्ता आपल्या घरापर्यंत येणार असल्याने केंद्रात जसे नरेंद्र मोदी यांनी काम केले आहे तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्यामुळे राज्यात भाजपाला भक्कम करा असे आवाहनही अमृता फडणवीस यांनी केले.

उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा
'माझं कुटुंब माझी जबाबदारी असे स्रिया म्हणू शकतात. पण माझं कुटुंबच माझी जबाबदारी हे एक मोठा नेता म्हणत असेल तर अडचण आहे अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे असं कधी म्हणत नाही, त्यांनी संपूर्ण महिला, शेतकरी, मुलांची जवाबदारी घेतली आहे, त्यासाठी ते 24 तास काम करतात. त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे असा टोलाही त्यांनी नाव घेता ठाकरेंना लगावला.
लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ बनू नका
भाजप आणि महायुतीची राज्यात सत्तेत येणारच आहे, टीका करणे हे विरोधकांचे कामच आहे, यात काही नवीन नाही. विरोधक लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ बनत आहेत. विरोधकांनी असं करायला नको, बहिणींचं चांगलं होतं आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांना गरज आहे. कोर्ट केसेस करुन नयेत, अडथळा आणू नये, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी केले.
फडणवीसांच्या कार्यालयातील तोडफोडीवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेनं तोडफोड केल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, 'अशा घटना घडत असतात. अशा गोष्टी चालू असतात. मानसिक तणावात असलेल्या तोडफोड करणाऱ्या महिलेला ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्यांच्याकडे थोडं सहानुभूतीने पाहिल पाहिजे.'












Click it and Unblock the Notifications