अजितदादा - प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? वंचितकडून सकारात्मक प्रतिसाद
Mumbai: लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. अजित पवार गटाला केवळ एक जागा जिंकता आली. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे रायगडमधून विजयी झाले. त्यामुळे अजित पवार गटाकडून आता विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी वंचित बहुजन आघाडीला साद घातली आहे. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर ते महाराष्ट्राचं राजकारण बदलवू शकतील असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये दुवा बनण्याची संधी मिळाली तर मी माझे भाग्य समजेल, असे विधान देखील अमोल मिटकरी यांनी केले. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी यावर भाष्य केलंय.
अजित पवारांसोबत जाण्याचा विचार सध्यातरी नाही
रेखा ठाकूर म्हणाल्या की, अजित पवारांचा पक्ष सध्या राज्यात आणि देशात भाजप बरोबर आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीकडून त्यांच्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकत नाही. भाजपबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध ठेवण्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आहे.
अजित पवार यांचा गट भाजपच्या युतीमधून बाहेर पडल्याशिवाय सोबत येण्याचा कुठलाही विचार केला जाऊ शकत नाही.
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 22, 2024
― रेखाताई ठाकूर
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी#VBAForIndia pic.twitter.com/s29w7pmsP8
त्यामुळे या मुद्यावर आता तरी कोणताही विचार करता येणार नाही, असे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीत वंचितची निराशाजनक कामगिरी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची कामगिरी अतिशय निराशाजनक राहीली. अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तर राज्यात इतर ठिकाणी देखील वंचितला अपेक्षित यश मिळालं नाही. गेल्यावेळे पेक्षाही कमी मतं यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळाली.
विधानसभेत वंचित-मविआ एकत्र येणार?
लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. याचा फटका प्रकाश आंबेडकरांना बसला असं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.
राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना महाविकासआघाडीकडून पुन्हा साद घातली जाऊ शकते. त्यामुळं विधानसभेत तरी प्रकाश आंबेडकर मविआसोबत जातील की नाही याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे.
अजित पवारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न
दरम्या, अमोल मिटकरी यांनी महायुतीत अजित पवारांना एकटे पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. मिटकरी म्हणाले, अजित पवारांना महायुतीत एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राष्ट्रवादीने महायुतीत राहू नये असेही प्रयत्न केले जात आहेत. दादांनी स्वतःहून महायुतीला सोडचिठ्ठी द्यावी यासाठी त्यांना हा मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता.












Click it and Unblock the Notifications