NCP एकत्रीकरणाच्या छुप्या बैठकांचा 'सत्यनामा'; खा. अमोल कोल्हेंची स्पष्टोक्ती अन् १६ मे चा तो प्रवास
Amol Kolhe statement on NCP merger : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावरून महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, आता शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या चर्चांमागची 'वस्तुस्थिती' मान्य करत अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. "होय, दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा झाली होती आणि मी स्वतः या प्रक्रियेत सुरुवातीपासून सक्रिय होतो," असे कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

16 मे चा तो प्रवास आणि चर्चेची ठिणगी
अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत १६ मे रोजीच्या एका प्रवासाचा संदर्भ दिला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारसभेनंतर कोल्हे यांनी अजित पवार यांच्यासोबत बारामती ते पुणे असा प्रवास केला होता. याच प्रवासादरम्यान एकत्रीकरणाच्या हालचालींना वेग आला आणि तेव्हापासूनच आपण या प्रक्रियेत सहभागी झाल्याचे कोल्हे यांनी मान्य केले.
बैठकांचे सत्र: कोठे आणि किती वेळा?
आमदार रोहित पवार यांनी १३ बैठकांचा दावा केला होता, मात्र अमोल कोल्हे यांनी त्यापेक्षाही अधिक बैठका झाल्याचे सांगितले. त्यांच्या माहितीनुसार:
- एकूण बैठका : १४ वेळा दोन्ही गटात चर्चा झाली.
- स्थळ : यातील ११ बैठका जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पार पडल्या.
- सहभाग : या प्रक्रियेत अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे हेदेखील चर्चेत होते.
"जे काही ठरले होते, ते आता सार्वजनिक झाले आहे. एकत्रीकरणाच्या चर्चा झाल्या ही वस्तुस्थिती आहे आणि त्यात मी सुरुवातीपासून सहभागी होतो, असे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितले.
'कोल्हे प्रदेशाध्यक्ष होणार होते' - रोहित पवारांचा दावा
या संपूर्ण नाट्यात सर्वात महत्त्वाचा दावा रोहित पवार यांनी केला. जर दोन्ही गट एकत्र आले असते, तर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अमोल कोल्हे यांची नियुक्ती झाली असती. ही खुद्द अजित पवार यांचीच इच्छा होती, असे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोल्हे यांनी प्रामाणिकपणे हा पुढाकार घेतला होता, असेही त्यांनी नमूद केले.
सीसीटीव्ही फुटेजचे आव्हान
रोहित पवार यांनी या चर्चांना केवळ अफवा म्हणणाऱ्यांना उघड आव्हान दिले आहे. "ज्यांना शंका आहे त्यांनी जयंत पाटील यांच्या घरातील त्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे," असे आव्हानात्मक शब्द त्यांनी वापरले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
प्रफुल्ल पटेलांकडून चर्चा फेटाळली
एकीकडे शरद पवार गटातील नेते बैठकांचा पाढा वाचत असताना, अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या चर्चांना फारसे महत्त्व दिले नाही. "आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमच्या संघटनात्मक निवडी आमचा अंतर्गत विषय आहे," असे सांगत त्यांनी एकत्रीकरणाच्या शक्यतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.












Click it and Unblock the Notifications