अक्षय शिंदे एनकाऊंटरची ए टू झेड माहिती.. कोण काय म्हटलं? चकमकीवर का लागतंय प्रश्नचिन्ह? जाणून घ्या
Akshay Shinde Encounter : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एनकाऊंटरवर विरोधक प्रश्नचिन्ह लावत आहेत. त्यानंतर त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे एनकाऊंटर नाही तर स्वसंरक्षणार्थ केलेला बचाव असल्याचं म्हटलं आहे.
आता या प्रकरणात नेमकं खरं काय हाही प्रश्न आहे आणि सत्यता जाणून घेण्यासाठी विरोधकांनी कोर्टाची पायरी चढण्याचाही इशारा दिला आहे. या धर्तीवर अक्षय शिंदे एनकाऊंटरचूी ए टू झेड माहिती तसंच एनकाऊंटवर प्रश्नचिन्ह राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप जाणून घेऊया.

विरोधक लावताहेत हे प्रश्नचिन्ह
विरोधकांनी म्हटलं की, बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे याच्यासंदर्भात दोन बातम्या आल्या. पहिली बातमी की आरोपीने आत्महत्या केली नंतर दुसरी बातमी आली की त्याचा एनकाऊंटर झाला. यामुळे प्रश्न निर्माण होत आहे. विरोधकांच्या मते.. आरोपीला शिक्षा व्हायला हवी होती पण अनेक प्रश्नाची उत्तर आरोपीकडून उकल हवी होती. त्यांचे हे तीन प्रश्न..
- पोलिसांची लाॅक असलेली गण तो उघडू कसा शकतो?
- हातात बेड्या असताना काढतो कशी फायरिंग करतो?
- अर्ध्या तासाच्या अंतरात दोन बातम्या येतात कशा असा प्रश्न?
शरद पवार
बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.
सुप्रिया सुळे
"महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफआय आर दाखल करण्यात आला. मात्र, आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे"
जयंत पाटील
"पोलिसांची पिस्तूल घेऊन एखादा आत्महत्या करत असेल तर ही गंभीर बाब आहे.पोलिसांचे काय चाललं आहे याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. याची सविस्तर चौकशी व्हावी.या प्रकरणात उशिरा गुन्हा नोंदवला. आरोपीच्या हाती रिवाल्वर लागणे हे अतिशय गंभीर आहे."
अमोल कोल्हे
"या प्रकरणावर संशयाची चादर निर्माण झाली आहे. आरोपी पोलिसांच्या संरक्षणात असताना स्वतःवर गोळी झाडून घेत असेल तर पोलीस खात्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. राज्यातले गृहमंत्री हे कोणाकडे नेतृत्व जाणार यात मश्गूल आहे, नागपूर मध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गृहमंत्र्यांच्या होमटाऊन मध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते. बदलापूरचा जो प्रकार घडला तो कसा घडला याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर यायला हवे."
महेबूब शेख
बदलापूर घटनाही खूप गंभीर आहे त्या आरोपीला जगण्याचा अधिकारच नाही. अधिक चांगलं झालं असतं जर त्याला फाशी दिली असती. या सगळ्या गोष्टीत पोलिसांवर संशय निर्माण होत आहे. बलात्कारातील आरोपीच्या बाहेर आणताना हातात बेड्या नव्हत्या का. तो काय टुरिझमला आला थोडीच. मुळात याच्यात वाटतं आरोपी अजून कुठे जाऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव होता का?"
विजय वडेट्टीवार
"या आरोपीला पोलिस व संस्थाचालकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरच नागरिक संतापले होते. आता त्याला न्यायालयात सादर केले जात असताना झालेली घटना म्हणजे एका आरोपीला संपवून अन्य सहआरोपींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का... या प्रकरणातील सत्यता जाणून घेण्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यासाठी प्रसंगी आपण न्यायालयात जाणार आहोत.
एकनाथ शिंदे
"अक्षय शिंदेने पोलिसांची बंदुक खेचून फायरिंग केली. या गोळीबारात एपीआय निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर काही पोलिसही जखमी झाले आहेत. अक्षय शिंदेने फायरिंग केल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ, बचावासाठी गोळीबार केला आहे."
देवेंद्र फडणवीस
"आरोपीच्या पुर्वाश्रमीच्या पत्नीने अक्षय शिंदेवर लैंगिक प्रकरणी आरोप होता. त्या प्रकरणात आज ट्रान्झिस्ट रिमांडसाठी नेताना अक्षयने पोलिसांची बंदुक घेऊन गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळ्या घातल्या. पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.आरोपींनी एकूण तीन राऊंड फायर केले आणि या घटनेत एक पोलिस अधिकारी जखमी झाला."
चित्रा वाघ
"बदलापूरचा हरामखोर नराधम ठार झाला. त्याला जागच्या जागी फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करणारे विरोधक आता चौकशीची मागणी करतात...किती दुटप्पीपणा ? आपल्या पोलिसांवर एखादा आरोपी हल्ला करीत असेल तर काय त्याची आरती करायची..? बदलापूरच्या नराधमाचा विरोधकांना इतका पुळका का..? की नुसते राजकारण करणार..? राजकारण करणार्यांना या विरोधकांना लाज वाटली पाहिजे."
एनकाऊंटरची डिटेल्स माहिती
- काल सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झीट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
- यामध्ये मोरे यांच्या पोटाला व मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती होती.
- सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला.
- अक्षय शिंदेला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले.












Click it and Unblock the Notifications