इकडे भुजबळ-फडणवीसांची भेट; तिकडे अजित पवारांनी एका वाक्यात दिली भेटीबाबतची प्रतिक्रिया
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहेत. शपथविधी सोहळ्यालाही ते गैरहजर राहिले होते. भुजबळांनी आपली नाराजी अनेकदा थेट प्रसारमाध्यमांसमोर बोलून दाखवली आहे. भुजबळांनी रविवारी थेट अजित पवारांना प्रश्न विचारले. त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर नाराजीही व्यक्त केली. आज त्यांनी थेट सागर बंगला गाठत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी थेट प्रश्न विचारला.

काय म्हणाले अजित पवार
आज सकाळी १० वाजता भुजबळांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेथे या दोन्ही नेत्यांची सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू...
अजित पवार पुणे दौऱ्यावर
अजित पवारांनी काल बारामतीकरांचा सत्कार स्विकारला. आज ते पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पुण्यातील विविध विकासकामांची माहिती घेत, अधिकाऱ्यांना मार्गदर्शने केले. पुण्यातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे पवारांनी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, येत्या १५ दिवसांत एक महत्वाची बैठक घेऊन त्यामध्ये पोलीस विभाग, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिकेचे अधिकारी अशा सर्वांना बोलवून यामधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सारथी संस्थेचेही काही प्रश्न आहेत. ते प्रश्न देखील सोडवायचे आहेत", असं अजित पवार यांनी सांगितलं.












Click it and Unblock the Notifications