अजित पवारांची राष्ट्रवादी बारामतीतून फुंकणार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग बारामती येथून फुंकणार आहेत. येत्या 14 जुलै रोजी बारामतीमध्ये अजित पवार गटाची पहिली सभा पार पडणार आहे.
तत्पूर्वी आज अजित पवार गटातील नेते, आमदार आणि मंत्री सिद्धिविनायकाच्या चरणी दाखल झाले. दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता आम्ही पुढच्या कामाला लागणार अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कालच पक्षातील आमदार, खासदारांसह प्रमुख नेत्यांसोबत अजित पवारांनी महत्वाची बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी ध्येयधोरणे आणि योजनांवर त्यांनी भर दिला होता. त्यानंतर आज पक्षातील महत्वाचे नेते, खासदार, आमदारांसोबत त्यांनी सिद्धीविनायक मंदिरात गणेशाचे दर्शन घेतले.
आजपासून राष्ट्रवादी कामाला लागणार
अजित पवार म्हणाले, आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज मंगळवार असल्याने दर्शनासाठी आजचा दिवस मुद्दामहून ठरवला. आम्ही सर्वांनी एकत्र दर्शन घेतले. चांगल्या कामाची सुरुवात देवाचे दर्शन घेऊन केली जाते. आम्ही आता पुढच्या कामाला लागणार आहोत. जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे . लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी समोर जाणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले.
14 जुलै रोजी बारामतीत पहिली सभा
अजित पवार म्हणाले, 14 तारखेली पहिली सभा बारामतीत होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय निर्णय घेतले? कुठल्या योजना दिल्या? त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. लोकांना आमचे काम आम्ही दाखवून देणार आहोत.
पुढे वाटचाल करताना विकासाचे मुद्दे आम्ही जनतेसमोर नेणार आहोत. जनेतेने आम्हाला आशीर्वाद द्यावेत, ते मतदारराजा आहेत म्हणूनच त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत.
काय म्हणाले सुनील तटकरे?
सुनील तटकरे म्हणाले, आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी सिद्धिविनायचे दर्शन घेतले आहे. आम्हाला सिद्धिविनायचे पूर्ण पाठबळ मिळेल असा आमचा विश्वास आहे. येणाऱ्या विधानसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सिद्धिविनायकाला साकडे घातले असून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत.
नरेश अरोरा नवे रणनितीकार
लोकसभा निवडणुकीत अवघ्या एका जागेवरच विजय मिळवू शकलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी अजित पवारांनी एक खेळी आखली आहे.
काँग्रेसचे रणनितीकार नरेश अरोरा यांचा काँग्रेसच्या यशात वाटा आहे. हीच बाब हेरुन त्यांनी नरेश अरोरा यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी रणनितीकार म्हणून अरोरांची त्यांनी निवड केली आहे.












Click it and Unblock the Notifications