भाजपच्या बालेकिल्ल्यावर अजित पवारांचा डोळा! गंगापूर विधानसभा मतदारसंघावर सतीश चव्हाण यांचा दावा
Ajit Pawar's MLA Satish Chavan's claim for Gangapur assembly constituency : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार प्रशांत बंब करीत आहेत. बंब यांनी या मतदारसंघात सलग तीन वेळा विजय मिळवला. आता ते विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. पण, त्यांचे टेंशन वाढले आहे. महायुतीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. चव्हाण हे पदवीधर मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या या घोषणेने महायुतीत ठिणगी पडू शकते, असा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
प्रशांत बंब म्हटले की मुख्यालयी न राहणार्या शिक्षकाविरुद्ध आंदोलन करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या आंदोलनाचा फटका भाजपला पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात बसलेला आहे. पण आमदार प्रशांत बंब 2009 ला अपक्ष म्हणून आणि 2014 व 2019 ला भाजपच्या चिन्हावर गंगापूर येथून निवडून आले आहेत. त्यामुळे सहाजिकच हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल. या मतदारसंघात गंगापूर, खुलताबाद या दोन तालुक्यांचा समावेश आहे.

बंब यांची पकड मजबूत
गंगापूर हा भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी बांधलेला मतदारसंघ आहे. मतदारसंघातील प्रत्येक घरातील सदस्यांपासून ते प्रत्येक योजनेचा लाभ कोणाला मिळाला याची माहिती आमदार बंब यांच्या कार्यकर्त्यांना असते. वॉटर ग्रीडसह विविध प्रकारच्या योजनांना निधी मिळविण्यातही ते अग्रेसर असतात. वाळूज येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियमवरही त्यांनी मंजूर करून घेतले. प्रत्यक्षात अजून काम सुरू झाले नाही. त्यामुळे गंगापूर मतदारसंघात पाय रोवण्यासाठी विरोधकांना बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.
या आहेत समस्या
या मतदारसंघातील वाळूज भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली. चोर्या, दरोडा, महिलांवरील अत्याचार हे प्रकार वाढत आहेत. प्रदूषण, ग्रामीण भागात रस्ते, पाणी याही समस्या आहेत
महाविकास आघाडीकडून कोण?
महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार हे निश्चित नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षाने दावा केला आहे. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीचे इच्छुक वेट अॅंड वॉचच्या भूमिकेत आहेत.

जातीय समीकरणे अशी
गंगापूर मतदार संघातील जातीय समीकरणांवर नजर टाकल्यास या मतदारसंघात मराठा समाजाचे अधिक प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतं. त्याबरोबरच माळी, धनगर, दलित-मुस्लिम यासह इतर समाजही या मतदारसंघांमध्ये आहे. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे.
आमदार सतीश चव्हाण काय म्हणाले होते?
गेल्या काही वर्षात मतदारसंघाचा विकास झाला नाही. मतदारसंघात प्रचंड अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांचीही घुसमट होत आहे. पण जनतेलाही बदल अपेक्षित बदल हवा आहे. सध्या सर्वे सुरू आहे. त्यामुळे कमी-जास्त होऊ शकते. पण जनतेच्या मनात जी व्यक्ती असते, त्याचेच नाव समोर येते. सर्वेमध्ये ज्यांचं नाव येतं त्यालाच पक्षाकडून उमेदवारी मिळते, असे सतीश चव्हाण यांचं म्हणणं आहे.
गत निवडणुकीत काय झाले?
गंगापूरमध्ये 2019 ची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. प्रशांत बंब हे त्या निवडणुकीत विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील आणि वंचितचे अंकुश कळवणे होते. प्रशांत बंब यांना 1 लाख 07 हजार 193 मतं मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या माने पाटील यांना 72 हजार 222 मतं मिळाली होती. वंचितच्या अंकुश कळवणे यांना 15 हजार 951 मतं मिळाली होती.












Click it and Unblock the Notifications