अजितदादांच्या व्हिडीओचं कवित्व, अर्थसंकल्पाबाबत विरोधकांना धरलं धारेवर
मुंबई- एरव्ही स्टुडीओतील कॅमेऱ्यासमोर जास्त न दिसणारे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी कॅमेऱ्यासमोर आले. त्यांचा एक्स अकाऊंटवर त्यांनी व्हिडीओ प्रसारित केला. अर्थसंकल्पाबाबत आपली भुमिका स्पष्ट करताना त्यांनी राज्यातील जनतेला भावनिक सादही घातली.

बाकीचे नेते राजकारण करतात पण आपण समाजकारण करतो असे सांगत दादांनी विरोधकांना चिमटे काढले. अर्थमंत्री म्हणून दोन दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत जनतेच्या मनातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न अजितदादांनी या व्हिडीओतून केला. मात्र या व्हिडीओत दादांचा आवाज मृदू तर वाटलाच, मात्र त्यांची आक्रमक स्टाईलही बदलेली दिसली.
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश !#दादाचा_वादा pic.twitter.com/JOlKJZMxYY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2024
अजितदादा मीडियासमोर मोजकच बोलतात. विरोधकांच्या टिकेला आक्रमकपणे उत्तरे देताना दिसतात. मात्र गुरुवारी त्यांचा एक व्हिडीओ प्रसारित झाला. कदाचित टेलिप्राँम्टरसमोरही समोर असावा. कॅमेरा, माईक, स्टुडीओ असं दादांबाबत पहिल्यांदाच दिसलं. स्वतःच्या कामाची जाहिरात करताना, दादा पहिल्यांदा महाराष्ट्राला दिसले. शिवाय त्यांच्या आवाजातही मृदूपणा दिसला. कदाचित दादा आजारी असावेत, असेही वाटले.
दादांनी नेमकं काय सांगितलं...
दादांनी या व्हिडीओतून जनतेला भावनिक साद घातली. विरोधक फक्त राजकारण करतात मात्र तुमचा दादा तुमच्यासाठी काम करत राहील, असे अजित पवार सांगताना दिसले. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबतही त्यांनी माहिती दिली. अर्थमंत्री म्हणून आपण मांडलेला अर्थसंकल्प कशाप्रकारे सर्वसमावेशक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने नवं पाऊल टाकण्यात क्रांतिकारी निर्णय ठरेल, असंही त्यांनी सांगितलं. आमच्या सरकारने आपल्या अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवलेले आहे. एवढेच नाही तर राज्यातील माता-भगिनींनी पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी इतर अनेक पावलं उचलण्यात आलेली आहेत, असंह दादांनी व्हिडीओतून स्पष्ट केलं.
विरोधकांनाही काढले चिमटे
अर्थसंकल्पावर टिका करणारे विरोधक हे निगेटिव्ह लोक आहेत. मला हिणवलं जातंय. मात्र त्यांना राजकारण करायचंय आणि मला काम करायचंय. वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याच्या घोषणाही विरोधकांना आवडली नाही. त्या बदल्यात मला शिव्याशाप देण्यात आले. मात्र मी शेतकऱ्यांचे दुःख व वेदना समजून घेतल्यात. नाकं मुरडणाऱ्यांचे चेहरे आजच बघून ठेवा. हे तेच लोक आहेत, ज्यांना विकासाची गंगा गरीबांपर्यंत येऊ द्यायची नाहीत. याच लोकांना सरकारी योजनांपासून, सामान्यांना दूर ठेवायचंय. असं म्हणत अजितदादांना विरोधकांना कधी चिमटे काढत तर कधी थेट बोलत चुचकारलं.












Click it and Unblock the Notifications