अजित पवार आज सादर करणार अर्थसंकल्प, शेतकरी, तरुण, महिलांसाठी कोणत्या घोषणा?
मुंबई: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून (२७ जून) सुरूवात झाली असून आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने यात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान काल जाहीर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज ७.६% वर्तवण्यात आला आहे. ही वाढ देशाच्या अर्थव्यवस्थेइतकीचं असून राज्याचे स्थूल उत्पादन ४० लाख ४४ हजार ८९८ कोटी अपेक्षित आहे. कृषी क्षेत्रामध्येही ९.१% वाढ अपेक्षित आहे.

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र कितव्या स्थानी?
दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर आहे. २०२२-२३ मध्ये दरडोई उत्पन्नामध्ये तेलंगणा पहिल्या क्रमांकावर, त्या खालोखाल कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात आहे. महाराष्ट्राचे २०२३-२४ मध्ये दरडोई उत्पन्न २ लाख ७७ हजार ६०३ रूपये अपेक्षित आहे.
राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार, सरकार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनाही नव्याने लागू करू शकते. तर राज्यात सुरू असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वादावर सरकार तोडगा काढण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदी केल्या जाऊ शकतात.
मुस्लिमांसाठी काय?
लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने महायुतीला मतं दिली नाहीत असं लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे. विधानसभा निवडणुकीत देखील ही मतं निर्णायक ठरणार आहेत. या दृष्टीने मुस्लीम समाजासाठीही सरकार काही तरतुदी करण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या दृष्टीने सादर होणार अर्थसंकल्प
लोकसभा निडवणुकीत महायुती सरकारला मोठा फटका बसलाय. हे नुकसान विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहे. राज्यातील शेतकरी, तरुण, महिला, कामगार यांच्यासह मराठा समाजासाठीही काही घोषणा केल्या जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.












Click it and Unblock the Notifications