अजित पवारांचा आक्रमक मूड; धनंजय मुंडे, शरद पवार गटाची फूट सगळ्यांवर बोलले...
शरद पवार गटाचे खासदार अजित पवार गटात येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. शिवाय अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या सात खासदारांसोबत संपर्क साधल्याच्याही बातम्या आल्या होत्या. या दोन्ही मुद्यांवर अजित पवारांनी आज आक्रमकपणे उत्तर दिले. याशिवाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरही त्यांनी थेट उत्तर दिले. पत्रकारांनी विचारलेल्या सर्वच प्रश्नांवर अजित पवारांचा मूड आज आक्रमक दिसला.

राष्ट्रवादीत पुन्हा फूट ?
अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या सात खासदारांशी संपर्क केला जात असल्याच्या बातम्यांवर आज अजित पवारांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर अजित पवार म्हणाले, हे धांदात खोटे आहे. शरद पवार गटाच्या निलेश लंके, अमर काळे आणि अजून एक दोन खासदारांनी सुनील तटकरेंनी आमच्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सर्व खासदारांनी थेट प्रसारमाध्यमांसमोर या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आहे. मग तु्म्ही या बातम्या कुठून आणल्या..? राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार आहेत किंवा आम्ही त्यांच्या खासदारांच्या संपर्कात आहोत, या सगळ्या बातम्या खोट्या आहेत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
उगाच आरोप नकोत
अजित पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न विचारला. ते म्हणाले, ते खासदार आज २०-२२ लाख लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मग ते सांगताहेत की आमच्याशी कुणीही संपर्क साधला नाही, तर तुम्ही आमचं नाव उगाच का घेताय..? ज्या बातमीची विश्वासार्हता आहे, त्याच बातमीबाबत तुम्ही प्रतिक्रीया विचारायला हवी. तुम्ही जर पुराव्यासह अजित पवारांनी हे केलंय असं म्हणताय, तर मग ते खासदार मीडियासमोर असं काहीच नाही असं सांगताहेत, तर तुम्ही उगाच आरोप कशाला करताय? असा सवालही अजित पवारांनी विचारला.
मुंडेंबाबतही स्पष्ट बोलले
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतही अजित पवार स्पष्ट बोलले. ते म्हणाले, "मी आमदार सुरेश धस यांना सांगितलं आहे, की तुम्ही नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असलेले पुरावे एसआयटीला द्या. ज्या न्याय व्यवस्था तपास करत आहेत, त्यांना पुरावे द्या. पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे योग्य नाही. याबाबत माझी चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा झालेली आहे. सरपंच हत्या प्रकरणात तीन वेगवेगळ्या तपास यंत्रणा फार बारकाईने चौकशी करत आहेत. या प्रकरणात आम्ही राजकारण येऊ देणार नाही. कुणालाही पाठिशी घालणार नाहीत", असं अजित पवारांनी पुन्हा स्पष्ट केलं.












Click it and Unblock the Notifications