अजितदादांनी 'त्या' चेकवरच केली सही; लाडक्या बहिणींसाठी दिली आनंदाची बातमी
लाडक्या बहिणींच्या जानेवारीच्या हप्त्याचा चेक शुक्रवारी महिला व बालकल्याण विभागाकडे दिला आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता आता दोन-तीन दिवसांत मिळेल, हे स्पष्ट झाले आहे. लाडक्या बहिणींसाठी अजित पवारांनी दिलेली ही बातमी नक्कीच आनंदाची आहे.

काय म्हणाले अजितदादा?
शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन सुरु आहे. त्यापूर्वीच अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज मोठी बातमी दिली. लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत त्यांनी थेट अपडेट देऊन टाकली. ते म्हणाले, आपण आणलेली लाडकी बहिण योजना कोणत्याही परिस्थितीत सुरुच राहणार आहे. याबाबत कुणीही काळजी करु नये. ज्या बहिणीच्या घरी चांगलं आहे, टॅक्स भरते, जिला नोकरी आहे, त्याच बहिणींबाबत आपण वेगळा विचार करणार आहोत. ही योजना प्रत्येक मायपाऊलींपर्यंत पोहोचविण्याचे काम, महिला व बालकल्याण विभागाने केलंय. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना आमची सत्ता असेलपर्यंत या योजनेतून पैसे मिळणार आहेत.
जानेवारीच्या हप्त्याबाबत अपडेट
अजित पवारांनी जानेवारीच्या हप्त्याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या शुक्रवारीच लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठीचा चेक मी सही करुन दिलेला आहे. येत्या २६ जानेवारीच्या आत या महिन्याचा हप्ता बँकेत जमा होईल. या योजनेबाबत कुणीही काळजी करु नये, असा विश्वासही त्यांनी दिला. अजित पवारांनी दिलेल्या माहितीवरुन सोमवारपासून किंवा येत्या दोन दिवसांत लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.
२१०० रुपये कधी?
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींचा हप्ता १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करणार असल्याचं सांगितलं होतं. आता महायुती सत्तेत आली आहे. त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. याबाबतही अजित पवारांनी हिंट दिली. आम्ही दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्र तरतूद करुन एप्रिलपासून लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications