बारामतीत आता मी नको अन्य दुसरा आमदार पाहिजे; अजित पवारांचे निवडणूक न लढण्याचे संकेत
Ajit Pawar on Baramati Assembly : आता बारामतीकरांना मी नाही तर कुणीतरी दुसरा आमदार मिळायला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीतील कामाची तुलना नक्की करा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
तर येत्या निवडणुकीत दादा नेमकं कोणाला उभं करतात, याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आज अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी लोकसभेत झालेल्या पराभवावरुन मनातील खंत व्यक्त केली.

काय म्हणाले अजित दादा?
अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता 65 वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. 'एकच दादा अजित दादा' अशा घोषणा दिल्या. अजित पवार त्यांना थांबवत पुन्हा म्हणाले, जिथे पिकतं तिथे विकत नाही. एकदा बारामतीकरांना मी सोडून इतर आमदार मिळाला पाहिजे. मग तुम्ही त्याच्या कारकिर्दीतील आणि माझ्या कारकिर्दीची तुलना करा.
पूर्वीचे अन् आत्ताचे रस्ते पाहा, कामं पाहा
अजितदादा म्हणाले- बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. 91 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा. बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. आता बारामती शहर सोडून साडे सातशे कोटीच्या योजना सुरू आहेत. पूर्वी बारामतीचे रस्ते बघितले आहेत. आताचे रस्ता बघा. काही राहिले असेल तर तेही मी मान्य करतो. कसे करायचे ते त्याचाही विचार करू. न मागता मेडिकल कॉलेज मिळालं. या मेडिकल कॉलेजला अहिल्यादेवीचं नाव देणार आहोत. तर आयुर्वेदिक महाविद्यालय आणणार आहोत.
काही चुकत असेल तर मला नक्की सांगा
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने सर्वांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. काहींचे राजीनामे घेतले. त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे. पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार अशी भूमिका घेऊ नका. काही चुकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन देखील अजित पवारांनी केले.












Click it and Unblock the Notifications