फडणवीसांच्या भेटीला अजित पवार पोहोचले सागर बंगल्यावर, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनेक घडामोडी पहायला मिळाल्या. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचे प्रकरण दिवसेंदिवस तापताना दिसले. आता सायंकाळी उशीरा उपमुख्यमंत्री अजित पवार हे सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. आता या भेटीचा तपशील समोर आला नसला तरी, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

राजकारणात दिवसभर घडामोडी
आज विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर काही वेळातच भाजपचे आ. सुरेश धस यांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आता सायंकाळी उशीरा धस-फडणवीस भेटीनंतर अजित पवारही सागर बंगल्यावर पोहोचले. ही भेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुंडे- अजित पवारांची भेट
विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर मुंडे यांनी मंत्रालयात जावून अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांनंतर ते आज पहिल्यांदाच अजित पवार यांना अशाप्रकारे प्रत्यक्षपणे भेटले. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं. या भेटीत धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात एक तास चर्चा झाली. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांच्या भेटीनंतर आपल्या खात्याबाबत घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा केली, असं त्यांनी सांगितले.
अजित पवार सागर बंगल्यावर
भाजप आमदार सुरेश धस यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर काही वेळाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत राजीनामा द्यावा, अशी मागणी सत्ताधारी आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षाकडून केली जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा
धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या काही मिडिया हाऊसने चालवल्या आहेत. हा राजीनामा अजून उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून मंजूर केलेला नाही. कदाचित या राजीनाम्याबाबतच पवार-फडणवीस ही भेट सुरु असल्याचे काहींचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications