"अजित पवार चोरांचे सरदार, त्यांच्या विरुद्ध लढाई थांबणार नाही", लक्ष्मण हाके यांचा घणाघात
ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली असून, त्यांना "चोर, कारखानदार आणि दरोडेखोरांचा प्रमुख" अशी उपमा दिली आहे. "जोपर्यंत त्यांचं खरं रूप उघड करत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही," असं वक्तव्य हाके यांनी एका खास मुलाखतीदरम्यान केलं.

अमोल मिटकरींवरही जोरदार टीका
हाके यांनी यावेळी आमदार अमोल मिटकरी यांचाही समाचार घेतला. "मिटकरी आमच्यासारख्या समाजाला गुन्हेगारी प्रवृत्तीचा म्हणतात. सुरुवात त्यांनी केली, पण शेवट मात्र आम्हीच करणार," असं ते ठामपणे म्हणाले. मिटकरींनी हाके यांच्याबाबत केलेल्या गाडीच्या वक्तव्यावरही त्यांनी रोष व्यक्त केला. "गाडी ही लोकांनी दिली होती, ती मला लागलीच कारण माझी जुनी गाडी सतत बिघडत होती," असं त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारवर आणि भाजपवरही सवाल
भाजपकडून अजित पवारांना सरकारमध्ये घेतल्यावर लक्ष्मण हाके यांनी प्रश्न उपस्थित केला - "आज अजितदादा, उद्या सुप्रिया सुळे आणि मग रोहित पवार? मग आम्ही लढायचं, आणि पवार कुटुंब तूप रोटी खायचं का?" असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वालाही त्यांनी यासंदर्भात थेट विचारणा केली.
"मी व्यापारी नाही, ना माझा कारखाना"
हाके यांनी स्वतःच्या पार्श्वभूमीविषयी सांगताना म्हटलं, "मी कोणताही उद्योगपती नाही, माझं पवार कुटुंबासारखं काही मोठं साम्राज्य नाही. माझ्याकडे बारामती अॅग्रोसारखा कारखाना नाही. पण मी लोकांसाठी आवाज उठवत राहणार."
मिटकरींचा पलटवार: "हाके हा बारा छिद्रांचा पाना"
दुसरीकडे, अमोल मिटकरी यांनी हाके यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. "हाके हा बारा छिद्रांचा पाना आहे. अजितदादांवरून थेट त्यांच्या बापावर जाऊन टीका करतो, पण आम्ही असं करत नाही. आम्ही तुला उत्तर देऊन मोठं करणार नाही," असं म्हणत त्यांनी वाद पेटवला.
"हाकेंचा मालक दुसराच"
मिटकरींनी असा आरोप केला की, "हाकेंच्या मागे कोणी दुसराच हात आहे. त्यांच्याकडून काही 'तुकडा' मिळाला म्हणून ते पवार कुटुंबावर टीका करत आहेत. ते जरांगे यांच्यावर टीका करूनच ओबीसी नेते बनले." तसेच, फॉर्च्युनर गाडी विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे कुठून आले, यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications