अजित पवारांचा एकही मंत्री स्टार प्रचारक नाही; दिल्ली विधानसभेसाठी २० जणांची यादी जाहीर
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आता रंगतदार वळणावर आल्या आहेत. भाजप व आपमध्ये या निवडणुकीत जोरदार टक्कर पहायला मिळणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून उद्यापासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. याच धामधुमीत अजित पवार गटाने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

कोण आहेत स्टार प्रचारक?
अजित पवार गटाच्या स्टार प्रचारकाच्या यादीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. अजित पवार गटाने स्टार प्रचारकांची २० जणांची यादी जाहीर केली आहे. त्यात स्वतः अजित पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, ब्रीज मोहन श्रीवास्तव, सुबोध मोहिते, अविनाश आदीक, संजय प्रजापती, उमाशंकर यादव, धीरज शर्मा, चैतन्य मानकर, विरेंद्र सिंग, दिपाली अरोरा यांच्यासह आणखी काही नेत्यांचा समावेश आहे.
कसा आहे निवडणूक कार्यक्रम?
उद्या म्हणजेच 17 जानेवारीपासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 18 जानेवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. 20 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या मतदानाचा निकाल आठ फेब्रुवारीला लागणार आहे.
मंत्र्यांना संधी नाही
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ कॅबिनेट मंत्री व एक राज्यमंत्री आहे. मात्र स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार वगळता एकाही मंत्र्यांचा समावेश नाही. या मंत्र्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत का घेतले नाही, हा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.












Click it and Unblock the Notifications