अजित पवार गटातील दोन बडे नेते शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Ajit Pawar group Babanrao Shinde and Vilas Lande met Sharad Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच मुंबईचा दौरा केला. लवकरच विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शरद पवारही रणनिती आखत आहेत. ते आपल्या जुन्या सहका-यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पुण्यातील मोदी बागेतील शरद पवारांच्या निवासस्थानी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची भेटीसाठी गर्दी झाली आहे. दरम्यान अजित पवार गटाचे दोन नेते शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे.
सोलापूरमधील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे हे शरद पवारांना भेटण्यासाठी आले आहेत. बबन शिंदे सध्या अजित पवार गटात असून पुन्हा शरद पवार गटात येण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

तर पिंपरी चिंचवडचे अजित पवार गटाचे नेते विलास लांडे हे देखील शरद पवारांच्या भेटीला मोदीबागेत पोहचले आहेत. विलास लांडे यांनी भोसरी विधानसभेची निवडणूक लढवली होती. आता ते शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
राजन पाटील, रमेश कदम यांनीही घेतली होती अकलूजमध्ये भेट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना नुकतेच सहकार परिषदेचे अध्यक्षपद देऊन दादांनी राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. हे पद देऊन तीन ते चार दिवस होत नाही, तोच राजन पाटील हे रविवारी शरद पवार यांच्या बैठीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूजमधील शिवरत्न बंगल्यावर गेले.अजित पवारांनी महामंडळाचे अध्यक्ष केले असले तरी शरद पवार हे आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीला आलो आहे. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांना भेटण्यात गैर काय? असा सवाल राजन पाटील यांनी केला होता.
तर मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे देखील शरद पवारांच्या भेटीसाठी अकलूज येथे दाखल झाले होते. आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, मी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढावी. त्यामुळे मी शरद पवार साहेबांना मोहोळमधून उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी मिळाल्यास मी मोहोळमधून तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे, असंही रमेश कदम यांनी सांगितले सांगितले होते.












Click it and Unblock the Notifications