महिला आयपीएससोबत वाद ! अजितदादांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू येथे अवैध मुरूम उत्खननावरून निर्माण झालेल्या वादात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवर धमकावल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला. यामुळे आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा आणि अजित पवार यांच्यातील संवादाची चर्चा सर्वत्र सुरू झाली. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार यांचे स्पष्टीकरण
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.
आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 5, 2025
नेमका वाद काय आहे?
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाची तक्रार स्थानिक प्रशासनाकडे आली होती. यावर कारवाई करण्यासाठी तहसीलदार आणि तलाठी यांच्यासह सरकारी पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, तेथे उपस्थित काही स्थानिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन अधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तणाव वाढला.
याचवेळी, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अंजली कृष्णा आपल्या टीमसह तिथे दाखल झाल्या. त्यांनी परिस्थिती हाताळत अवैध उत्खननावर कारवाई सुरू केली. मात्र, कारवाई सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याने थेट अजित पवारांना फोन लावला. या फोनवर अजित पवार यांनी थेट अंजली कृष्णा यांच्याशी संपर्क साधून त्यांना दम दिल्याचा आरोप आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राजकीय स्वरूप धारण केले आहे.
अंजली कृष्णा यांची ओळख आणि पार्श्वभूमी
आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा व्ही.एस. आहे. सध्या त्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी (डीएसपी) म्हणून कार्यरत आहेत. अंजना कृष्णा यांची ओळख एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आयपीएस अधिकारी म्हणून आहे.
अंजना कृष्णा यांनी यूपीएससी सीएसई 2022-23 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर ३५५ वा क्रमांक मिळवला होता. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार, केरळमधील तिरुवनंतपुरम येथे जन्मलेल्या अंजना कृष्णा यांचे वडील बीजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर त्यांची आई सायना न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करतात. मूळच्या मलयंकीझू येथील असलेल्या अंजना कृष्णा यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट मेरी सेंट्रल स्कूल, पूजप्पुरा येथे पूर्ण केले. त्यानंतर, त्यांनी नीरामंकरा येथील एच.एच.एम.एस.पी.बी. एनएसएस महिला महाविद्यालयातून गणित विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर, त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करून यश मिळवले.












Click it and Unblock the Notifications