Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पुण्यात अजित पवार गटाकडून गुंडगिरीला 'राजकीय बळ'; गजा मारणेच्या पत्नीनंतर आंदेकर टोळीलाही उमेदवारी

Ajit Pawar Faction Accused of Backing Gangsters in Pune : 'गुन्हेगारीमुक्त पुणे' आणि 'विकासाची भाषा' करणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीत धक्कादायक पाऊल उचलले आहे.

कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिल्यानंतर, आता येरवडा कारागृहात बंदिस्त असलेल्या आंदेकर टोळीतील सदस्यांनाही पक्षाने मैदानात उतरवले आहे. यामुळे पुण्याच्या राजकारणात 'गुन्हेगारीचे उदात्तीकरण' होत असल्याची चर्चा सुरू झाली असून अजित पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Ajit Pawar Faction Accused of Backing Gangsters in Pune

आंदेकर कुटुंबाला 'एबी' फॉर्म; कमालीची गुप्तता

पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या कुटुंबाला अजित पवार गटाने उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, पक्षाने याची कोणतीही अधिकृत घोषणा न करता कमालीची गुप्तता पाळली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आंदेकरांच्या वकिलांनी भवानी पेठ प्रादेशिक कार्यालयात धाव घेऊन सोनाली वनराज आंदेकर आणि उदयकांत आंदेकर यांचे 'एबी' फॉर्म सादर केले. बंडू आंदेकर सध्या नातू आयुष कोमकर याची हत्या आणि ५ कोटी ४० लाखांच्या खंडणी प्रकरणी कारागृहात आहे.

न्यायालयाची अटीशर्त परवानगी

कारागृहात असताना निवडणूक लढवता यावी यासाठी आंदेकर कुटुंबाने विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. "निवडणूक लढवणे हा नागरिकांचा अधिकार आहे," असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली, मात्र त्यांच्यावर काही कडक अटीही लादल्या आहेत.

गजा मारणेची पत्नी प्रभाग १० मधून रिंगणात

पुण्यातील दुसरी कुख्यात टोळी असलेल्या गजा मारणेच्या पत्नी जयश्री मारणे यांनाही राष्ट्रवादीने (अजित पवार गट) प्रभाग क्रमांक १० मधून उमेदवारी दिली आहे. गजा मारणे सध्या कोथरूडमधील एका भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाशी संबंधित असलेल्या या कार्यकर्त्याला मारणे टोळीने बेदम मारहाण केली होती. अशा पार्श्वभूमीवर त्याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

"मी आत्मदहन करेन": पीडित मातेची आर्त हाक

आंदेकर कुटुंबाला उमेदवारी देण्यास खुद्द बंडू आंदेकरची मुलगी आणि मृत आयुष कोमकरची आई हिने तीव्र विरोध केला आहे. "आंदेकर टोळीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. जर या गुन्हेगारांना राजकीय पाठबळ दिले, तर मी पक्षाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेन," असा इशारा तिने अजित पवारांना दिला होता. मात्र, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत पक्षाने आंदेकर कुटुंबाला उमेदवारी बहाल केली आहे.

राजकीय नैतिकता आणि पुण्याचा कौल

एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या सुरक्षिततेच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे कुख्यात टोळ्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ५ कोटींच्या खंडणीचे आरोप आणि हत्येचे गुन्हे असलेल्या कुटुंबांना सत्तेत वाटा देणे, हे पुण्याच्या संस्कृतीला साजेसे आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+