अजित दादांना फोन लावून महिला IPSला धमकावणाऱ्या 'त्या' NCP कार्यकर्त्याचा वादग्रस्त Video
Babaraaje Jagtaps Controversial Video : मुरूम उत्खननासंदर्भात कारवाईसाठी गेलेल्या एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा थेट फोन लावून देणारा 'बाबाराजे जगताप' नावाचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा कार्यकर्ता चर्चेत आला आहे. या घटनेमुळे अजित पवार यांच्यावरही टीका झाली होती, आणि आता बाबाराजे जगतापचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

नेमकी घटना काय?
करमाळा तालुक्यातील पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी अवैध मुरूम उत्खननावर कारवाई सुरू केली होती. त्यावेळी, राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवक माढा तालुका अध्यक्ष बाबाराजे जगताप याने सरकारी कामात अडथळा आणला. जगताप याने आयपीएस अधिकाऱ्यांना फोनवर अजित पवार यांच्याशी संभाषण करण्यास भाग पाडले.
या संभाषणात अजित पवार यांनी 'मी डीसीएम बोलत आहे, ताबडतोब कारवाई थांबवा, नाहीतर मी तुमच्यावर ॲक्शन घेईन' अशा भाषेत बोलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
महिला आयपीएस अधिकाऱ्यांना थेट अजित पवारांशी संवाद साधायला लावणारा हा आहे सोलापूर जिल्ह्यातील एनसीपी कार्यकर्ता बाबाराजे जगताप, पाहा त्याचा वादग्रस्त व्हिडिओ. अशा लोकांचे अजित पवार समर्थन करतात काय? pic.twitter.com/vCl49Hp9yW
— Pratap Awachar - प्रताप अवचार (@pratapbhagawata) September 6, 2025
बाबाराजे जगतापचा नवा व्हिडिओ
या घटनेनंतर, बाबाराजे जगतापचा आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तो नशेमध्ये दिसत असल्याचा आरोप आहे. या नव्या प्रकरणामुळे जगतापच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्याचे नाव यापूर्वीही अवैध मुरूम उपसा आणि सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात आले आहे.
कार्यकर्त्यांची पाठराखण आणि राजकीय वाद
हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बाबाराजे जगतापची पाठराखण केली होती. उलट, त्यांनी आयपीएस अधिकाऱ्यालाच "तुम्हाला आवाज कळत नाही का?" अशा भाषेत बोलून टीका केली.
यापूर्वी, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणावर संघ लोकसेवा आयोगाला पत्र लिहून चौकशीची मागणी केली होती, मात्र, अजित पवार यांनी ट्विट केल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी देखील बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे आता उमेश पाटील देखील आपली भूमिका मागे घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जगतापवर या प्रकरणी अवैध मुरूम उपसा, सरकारी कामात अडथळा आणणे, आणि अधिकाऱ्याला धमकावणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.












Click it and Unblock the Notifications