'लालबाग राजा'च्या चरणी अमित शहा; महायुतीचे सर्व नेते हजर, आधी दादांची दांडी, नंतर भेटले एअरपोर्टवर
Amit Shah Mumbai Tour Ajit Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी सकाळी सपत्नीक मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी अमित शाहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, दीपक केसरकर, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे या नेत्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत हजर अशून देखील शाहांच्या दौऱ्यात पाहायला मिळाले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून दादांच्या मनात नेमकं काय सुरू असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील, अशी चर्चा सुरु झालेली आहे. दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांकडून अजित पवार यांच्याविरोधात टीका केली जात आहे. अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर पडायला भाग पाडणे, हा शिंदे गटाचा उद्देश मुख्य उद्देश असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. त्यातच आज अमित शाह यांच्या दौऱ्यात दादा न दिसल्याने चर्चांना उधाण आले.
दरम्यान, आधी लालबाग राजाच्या दर्शनात गैरहजर असलेले दादा नंतर काही वेळाने एअरपोर्टवर दाखल झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या ठिकाणी ते अमित शहांची भेट घेतील. तसेच या ठिकाणी बैठक देखील होणार असल्याचे सांगण्यात आले.

अजित पवार मुंबई एअरपोर्टवर भेटण्याची चर्चा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई विमानतळावर महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित राहणार आहेत. भाजपकडून राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बैठकीला उपस्थित राहतील. तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे बैठकीला उपस्थित असतील.
दादांची जीएसटी बैठकीला दांडी
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे सोमवारी होणाऱ्या वस्तू व सेवा कर कायदापरिषदेच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर केवळ एकदाच जीएसटी परिषदेच्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित राहिले होते. आजच्या बैठकीसाठी अजित पवार यांच्या ऐवजी आदिती तटकरे बैठकीसाठी दिल्लीला गेल्या असल्याचे सांगितले जात आहे.












Click it and Unblock the Notifications