शिंदेंकडील खात्याचं काम थेट फडणवीसांसमोर, आदीत्य ठाकरे-फडणवीसांची भेट आली चर्चेत
ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यासंदर्भात आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती त्यांनी स्वत:च दिली. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोनवेळा भेट घेतली होती. नागपूर हिवाळी अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली होती. या सलगच्या तीन भेटीमुळे सध्या चांगलीच चर्चा वाढली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वरळी मतदारसंघातील वरळीत राहणाऱ्या पोलीस पत्नी आणि गृहनिर्माणबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. पोलिस निवासात राहणाऱ्या निवृत्त पोलिसांना दंड लावला आहे, तो पर स्केवर फूट 20 रुपये होता तो 150 रुपये केला आहे. तो कमी करावा ही विनंती आम्ही केली, इथे अनेक पिढ्या होत्या त्यांनी, मुंबईची सेवा केली आहे. मागच्या सरकारने 8 दिवसात करु असं वचन दिलं होतं, ते झालं नाही, असे आदित्य यांनी पत्रकारांशी बोलतना सांगितलं.
शिंदेंऐवजी थेट फडणवीस?
आदित्य ठाकरे यांनी चर्चा केलेली खाती ही एकनाथ शिंदे यांच्या आखत्यारीतील आहेत. राज्याचे गृहनिर्माणमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पण या खात्यासंदर्भातील विषयाची चर्चा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली. विशेष म्हणजे शिवसेनेतील फुटीनंतर, शिवसेना पक्ष व चिन्ह बळकावल्यानंतर एकदाही ठाकरे कुटुंबातील कोणीही एकनाथ शिंदेंना भेटलेले नाही. आता मात्र फडणवीसांची सलग तीनदा भेट घेत, ठाकरे थेट फडणवीसांकडून काम करुन घेताना दिसत आहेत.
टोरेस घोटाळ्यासंदर्भातही चर्चा
मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांसमोर मांडला. सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईत लागू करावी, त्यावरील स्थगिती हटवावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच, आम्ही मोकळ्या मनानं आलो आहोत, अशात यावरील स्थिगिती उठवावी ही मागणी आणली आहे. तर, टोरेस घोटाळ्याप्रकरणीही कारवाई करण्याची मागणी आदित्य यांनी केली आहे.












Click it and Unblock the Notifications