वाद वाढणार..? प्राजक्ता माळी आ. सुरेश धसांविरोधात तक्रार करणार... रुपाली चाकणकर स्पष्ट बोलल्या
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबाबतचं परळी कनेक्शन आष्टीचे आ. सुरेश धस यांनी काल बोलून दाखवलं. प्राजक्ता माळी, सपना चौधरी, रश्मिका मंधाना यांच्यासारखं इव्हेंट मॅनेजमेंट पाँलिटिक्स ज्यांना करायचं असेल त्यांनी परळीला यावं, असं सुरेश धस म्हणाले होते. आता त्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं प्राजक्ता माळींनी आज सांगितलं. याच विषयात आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही महत्त्वाचे स्टेटमेंट समोर आलेय.

काय होता आ. धसांचा आरोप
मंत्री धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांचे नाव न घेता फक्त आका या शब्दावरुन आ. सुरेश धसांनी काल चांगलीच खळबळ उडवून दिली होती. या आकाने बीड जिल्ह्यात माजवलेला उपद्रव आ. धसांनी काल मीडियासमोर मांडला. त्यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव दोन वेळा घेतले. इव्हेंट मॅनेजमेंट पाँलिटिक्स शिकायचं असलं तर प्राजक्ता माळीसारखं परळी कनेक्शन बघावं लागेल, असा आरोप आ. धसांनी केला होता.
प्राजक्ता माळीची प्रतिक्रीया
आ. सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. त्यावर आज प्राजक्ता माळी यांनीही प्रतिक्रिया दिली. प्राजक्ता माळी या आ. धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याच्या बातम्या काही प्रसार माध्यमांनी दिल्या. या बातम्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली होती. अभिनेत्रींच्या परळी कनेक्शनमागे नेमकं काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न विचारला जाऊ लागला होता.
चाकणकर काय म्हणाल्या..?
या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, "अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अद्याप महिला आयोगाकडे तक्रार केलेली नाही. अद्याप आमच्याशी त्यांनी कुठलाही संपर्क साधलेला नाही. प्राजक्ता माळी यांनी, जर आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाईल, असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं. त्या पुढे म्हणाल्या. "बीडच्या घटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सखोल चौकशी करत आहेत. आरोप करणं हे विरोधकांचे काम आहे, त्यासंदर्भात मी काय बोलणार..?" असा प्रश्नही चाकणकर यांनी विचारला.
प्राजक्ता माळी घेणार पत्रकार परिषद
या सगळ्या वादावर अभिनेत्री प्राजक्ता माळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. 'माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार' असल्याचे प्राजक्ता माळी यांनी सांगितलं आहे. मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. प्राजक्ता माळी थेट पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. उलट-सुलट सुरु असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळेल असेही बोलले जात आहे.












Click it and Unblock the Notifications