अजित पवारांचे भाजपसोबत अजूनही वैचारीक अंतर; रेशिमबागेत घडले असे काही...
नागपूरातील रेशीमबागेत संघाच्या मुख्यालयात आज बौद्धीकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आरएसएसच्या स्मृती मंदीरात महायुतीच्या सर्व आमदारांसह घटकपक्षांनाही निमंत्रीत करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमासाठी हजर होते, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. अजित पवार गट अजूनही सेक्युलर भुमिकेवर ठाम आहे, ही चर्चा त्यामुळे रंगली.

स्मृती मंदीरात निमंत्रण
नागपूर येथील रेशीमबागेतीतल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयात आज बौद्धीकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महायुतीच्या सर्व नेत्यांना व आमदारांना आरएसएसने यासाठी निमंत्रीत केले होते. भाजपनेही मित्र पक्षातील आमदारांनाही रेशीमबागेतील स्मृती मंदिरात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज स्मृतीमंदीरात मुख्यमंत्र्यांसह सर्व पदाधिकारी व आमदार उपस्थित होते.
अजित पवारांनी मारली दांडी
रेशीमबागेत झालेल्या संघाचे बौद्धिकास अजित पवारांसह त्यांच्या गटाच्या आमदारांनी दांडी मारली. गेल्यावर्षीही हिवाळी अधिवेशनादरम्यान अजित पवार व त्यांचे आमदार स्मृति मंदीरात गेले नव्हते. तसेच लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमाच्यावेळीही अजित पवारांनी नागपूरातील रेशीम बागेत जाणं टाळलं होतं. आज पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली.
फडणवीस-शिंदेंची उपस्थिती
आज सकाळी 8 वाजता भाजपचे आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्मृती मंदिरात पोहचले. त्यांनी आरएसएस संस्थापक डॉ. हेडगेवार यांना श्रद्धांजली वाहली. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. रेशीम बागेत याआधीही आलो होते, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. संघाच्या शाखेतून माझी सुरुवात झाली आहे. संघाची शिकवण जोडणारी आहे तोडणारी नाही. मुख्यमंत्री देखील संघाचे सदस्य आहे. राष्ट्रसेवेत संघाचे योगदान नाकारता येत नाही. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकच असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अजित पवार गटाचीही पाठ
आम्ही संघाच्या मुख्यालयात जाणार नसल्याचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी कालच सांगितले होते. त्यामुळे आज अजित पवार येतील का, हा प्रश्न विचारला जात होता. मात्र खुद्द अजित पवार व त्यांचे आमदार या कार्यक्रमाला आले नाही. फक्त तुमसरचे अजित पवार गटाचे आमदार राजू कोरमोरे हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाकीच्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.












Click it and Unblock the Notifications