पालघरनजीक वाढवण बंदराला मंजुरी, तब्बल ७६ हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई: पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मान्यता देऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने पहिल्याच कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राला बंपर गिफ्ट दिलंय.. २०२९ पर्यंत या बंदराची निर्मिती केली जाणार आहे. महाराष्ट्र मेरी टाईम पोर्ट आणि जेपीए या बंदराचे बांधकाम करणार आहेत.

बंदराची वार्षिक कंटेनर मालाची हाताळणीची क्षमता २३ दशलक्ष टीईयूस, तर मालवाहतूक करण्याची क्षमता २५४ दशलक्ष टन असणार आहे. या बंदरापासून १२ किमीवर रेल्वे, तसेच काही किमीवर हायवे असेल. याचा फायदा उत्तर भारत, मध्य भारतासह अनेक उद्योगधंद्यांना होणार आहे. महत्वाचे म्हणजे जेएनपीटी बंदरावर असलेला ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या बंदरात 1,000 मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स, चार लिक्विड कार्गो बर्थ, एक रो-रो बर्थ, एक तटरक्षक धक्का आणि चार बहुउद्देशीय धक्के यांचा समावेश आहे. यासोबतच, 1,448 हेक्टर क्षेत्राचे पुनर्वसन, 10.14 किमी ऑफशोअर ब्रेकवॉटर आणि कंटेनर/कार्गो स्टोरेज क्षेत्रांचे बांधकाम करण्यात येणार आहे. देशातील सर्वात भव्य प्रकल्पांपैकी हा एक पायाभूत सुविधा प्रकल्प असणार आहे.
या संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, "महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराचा प्रकल्प हा गेमचेंजर प्रकल्प आहे. आता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून हे बंदर उभे राहील. या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना रोजगार मिळेल", असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
हा बंदर प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) ला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि सुदूर पूर्व, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये जलमार्गाने जाणाऱ्या मोठ्या जहाजांना हाताळण्यास सक्षम असेल. वाढवण बंदर पूर्ण झाल्यानंतर जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून ओळखले जाईल, ज्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार क्षमतेला एक नवा आयाम मिळेल.
हा प्रकल्प पीएम गतीशक्ती कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी अनुरूप आहे. या प्रकल्पामुळे जागतिक EXIM व्यापाराला चालना मिळणार असून, सुमारे दहा लाख व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळेल, असे केंद्रीय प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications