नाशिकमध्ये सापडले घबाड, निवडणूक आयोगाने एका नेत्याच्या गाडीसह पाच कोटी घेतले ताब्यात
महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यापूर्वीच महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक येथील एका नामांकित हाँटेलमधून पाच कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज सकाळी ही कारवाई केली. या कारवाईत एका मोठ्या नेत्याची गाडीही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
प्रचाराचा आज शेवटचा दिवस
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होईल. आज विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनेक मोठे नेते महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना, निवडणूक आयोगानेही डोळ्यात तेल घालत, राज्यभर कारवाया सुरु ठेवल्या आहेत. आज सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावतील.

नाशिकमध्ये मोठी कारवाई
निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केल्यानंतर पोलिस व निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी राज्यभर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये आज सकाळी कोट्यवधी रुपये सापडले. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. ही रक्कम पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईत एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडीही जप्त करण्यात आल्याचे समजते.
पोलिसांकडून चौकशी सुरु
निवडणूक आयोगाकडून आज सकाळच्या सुमारास या हॉटेलवर छापेमारी केली. यावेळी पाच कोटी रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे. पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे. तसेच इतकी मोठी रक्कम कुठून आणि का आणली? हे पैसे कुणी दिले? कशासाठी दिले? यासारखे अनेक प्रश्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत. शनिवारी मुंबईत 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. या पाठोपाठ नागपूर आणि जळगावात कोट्यवधी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आली. नागपुरात जप्त केलेल्या सोन्या चांदीची किंमत 14 कोटी इतकी आहे. तर जळगावात जप्त केलेल्या सोने, चांदीची किंमत पाच कोटी 59 लाख 61 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications