26/11मुंबई हल्ल्याच्या आठवणी! अजूनही अंगावर शहारे; कुठे आहे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईद?
26/11 Mumbai attacks Memories : 26 नोव्हेंबर 2008. भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस. या दिवशी पाकिस्तानातून समुद्र मार्गाने आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण भारताला वेठीस धरले. अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बहल्ल्याने मुंबई थीजून गेली. अडीचशे निष्पाप नागरिक मारले गेले. पोलीस अधिकारी शहीद झाले. अनेक जण जखमी झाले. अजमल कसाब नावाचा दहशतवादी जिवंत पकडला गेला. आणि या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध बिघडले.
आज 26/11 हल्ल्याच्या आठवणीचा दिवस म्हणजेच 26 नोव्हेंबर...मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या आठवणी आजही शहारे आणणाऱ्या आहेत. भारतीय हा हल्ला आजीवन विसरु शकत नाही.
आता चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट खेळण्यासाठी भारताने पाकिस्तानात यावे, असे आवाहन पाकिस्तानकडून केले जात आहे. मात्र इस्लामिक दहशतवाद्यांना आसरा देण्याचे पाकिस्तानकडून जोपर्यंत बंद केले जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवले जाणार नाहीत, असे भारताने स्पष्ट केले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान चॅम्पियन ट्रॉफीचा वाद सुरू असतानाच 26/ 11 दहशतवादी हल्ल्याचा स्मृतीदिन जवळ आला आहे आणि पुन्हा एकदा भारताच्या जखमा ताज्या झाल्या आहेत. तब्बल अडीचशे मुंबईकरांचे बळी घेणाऱ्या त्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड पाकिस्तानचा आजही सुरक्षित आहे. आणखी आठवडाभराने भारतात 26 नोव्हेंबरच्या त्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या होतील या पार्श्वभूमीवर हाफिज सईद विषयी जाणून घेणे आवश्यक आहे. तो पाकिस्तानात सध्या काय करतोय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
हाफीज सईद होता मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड
मुंबईवरील त्या हल्ल्याने संपूर्ण जग स्तब्ध झाले. या हल्ल्याचा सगळा कट कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईद याने रचला होता. सईद हा लष्कर ए तोयबा आणि जमात उद दावा या दहशतवादी संघटनांचा प्रमुख आहे. हाफिज सईदला प्रत्यार्पित करावे, अशी मागणी भारताने अनेक वेळा पाकिस्तानकडे केली आहे. मात्र वेळोवेळी वेग वेगळी कारणे सांगून पाकिस्तान त्याच्या प्रत्यार्पणास टाळाटाळ करत आहे.
मुंबई हल्ल्यात सईद याच्या सहभागाचे कोणतेही पुरावे नाहीत असे पाकिस्तानचे म्हणणे आहे मात्र भारताने अनेक वेळा या खटल्याचे डोसियर पाकिस्तानला दिले आहे. पाकिस्तानचे असेही म्हणणे आहे की, मुंबई हल्ल्याच्या खटल्यात हाफिज सईद याला पाकिस्तानातील न्यायालयांनी गुन्हेगार ठरवलेले नाही त्यामुळे त्याला भारताकडे प्रत्यार्पित करता येणार नाही. सध्या हाफिज सईद हा हा दहशतवादी संघटनांना निधी दिल्याच्या आरोपात पाकिस्तानातील एका कारागृहात बंद आहे मात्र पाकिस्तानच्या अंतर्गत त्याच्यावर मुंबई हल्ल्या संदर्भात कोणताही गुन्हा नोंद नाही.
गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात अमेरिकेने पाकिस्तानकडे लष्कर ए तोयबाचा संस्थापक हफिज सईद जो 2008 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे तसेच संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेला दहशतवादी आहे, त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. हाफिज सईद हा भारतीय तपास यंत्रणासाठी वांटेड दहशतवादी आहे
गेल्या वर्षी पाकिस्तानात निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र इमरान खान यांच्या पक्षाच्या एका उमेदवाराकडून त्याचा पराभव झाला. तल्हा सईद हा लष्कर ए तोयबा या संघटनेत आपल्या पित्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता आहे.
सईद ला मिळाली 78 वर्षांची शिक्षा
संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात असे म्हटले आहे की २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज सईद पाकिस्तानच्या अटकेत आहे आणि त्याला 78 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. या अहवालात असेही म्हटले आहे की दहशतवादी कारवायांना निधी दिल्याच्या आरोपावरून 12 फेब्रुवारी 2020 पासून हाफिज सईद शिक्षा भोगत आहे. मात्र तज्ञांचे असे म्हणणे आहे की 78 वर्षांची शिक्षा हे पाकिस्तानचे सरकार आणि आयएसआय यांची एक खेळी आहे आणि या माध्यमातून ते हाफिज सईद याचा बचाव करू इच्छित आहेत. वस्तुतः हाफिज सईद हा पूर्ण ऐश आरामात राहत असून त्याच्या मुलाची उमेदवारी तेच सिद्ध करत आहे
अमेरिकेने ठेवले इनाम
2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद याच्यावर अमेरिकेने दहा दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले आहे आणि त्याला मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. मात्र असे असूनही पाकिस्तानमध्ये त्याला सन्मानाची वागणूक मिळाली आहे. भारताच्या विरोधात सातत्याने प्रक्षोभक भाषणे करण्यात हाफिज याचा हातखंडा आहे. अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर तो सार्वजनिक व्यासपीठावर फारसा उपस्थित राहिलेला नाही












Click it and Unblock the Notifications