10th Board Exam : दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार, काय आहे CBSE चे नवे धोरण? वाचा सविस्तर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा मसुदा तयार केला आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याची पद्धत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची शक्यता आहे. मसुद्यानुसार, पहिली बोर्ड परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये आणि दुसरी मेमध्ये होईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (१ मार्चला) या नवीन बदलांचा मसुदा जाहीर केला.

कसे राहतील दोन परिक्षांचे टप्पे
सीबीएसई दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला टप्पा १७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान होईल, तर दुसरा टप्पा ५ ते २० मे दरम्यान होईल. सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "बोर्ड परीक्षांचे दोन्ही टप्पे संपूर्ण अभ्यासक्रमाच्या आधारे घेतले जातील आणि दोन्ही आवृत्त्यांसाठी उमेदवारांना समान परीक्षा केंद्रे वाटप केली जातील." दोन्ही परीक्षांचे परीक्षा शुल्क अर्ज दाखल करताना ठरवले जाईल आणि उमेदवारांना ते नोंदणीच्या वेळीच जमा करावे लागेल.
अभ्यासक्रमात काय बदल केले आहेत?
नवीन नियमांनुसार 9 वी आणि 10 वीच्या विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये दुहेरी पर्यायी अभ्यासक्रम लागू करण्यास बोर्डाच्या नियामक मंडळाने मंजुरी दिलेली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, विद्यार्थ्यांना या विषयांमध्ये दोन काठिण्यपातळींची निवड करता येईल. नववी आणि दहावीत शिकणारे विद्यार्थी या विषयांसाठी स्टॅण्डर्ड आणि अॅडव्हान्स असे पर्याय निवडता येतील. पुढील वर्षी हा पर्याय नववीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना 2028 पासून ही निवड करता येणार आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारावी म्हणून विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांमध्ये असा पर्याय देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना पुढच्या प्रवेश परीक्षांसाठी चांगली तयारी करता येईल असा युक्तिवाद करण्यात आला आहे.
संपूर्ण परीक्षा ३४ दिवसांची
मसुद्यानुसार, सीबीएसई इयत्ता १०वी परीक्षा २०२६ १७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान होणार आहे आणि दुसरा टप्पा ५ मे ते २० मे दरम्यान चालेल. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया ३४ दिवस चालेल, ज्यामध्ये ८४ विषयांचा समावेश असेल. २०२६ मध्ये सुमारे २६.६० लाख विद्यार्थी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत बसण्याची अपेक्षा आहे. भविष्यातही, सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा दरवर्षी १५ फेब्रुवारी आणि ५ मे नंतरच्या पहिल्या मंगळवारी सुरू होतील. दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याच्या प्रस्तावाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी देणे आहे, ज्यामुळे त्यांच्यावर परीक्षेचा दबाव आणि ताण कमी होईल.












Click it and Unblock the Notifications