राष्ट्राध्यक्षांच्या 'त्या' विधानाने संपूर्ण जगच हादरले; दुष्मनाबाबत जे बोलू नये, तेच बोलून गेले...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या शत्रूराष्ट्राच्या म्हणजेच रशियाच्या राष्ट्राध्यक्षबाबात त्यांनी असे काही विधान केले आहे की, सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे लवकरच मरतील. त्यानंतर दोन्ही देशांत सुरु असलेले युद्ध संपेल, असा विचित्र दावा झेलेन्स्की यांनी केला आहे. झेलेन्स्की यांनी पॅरिसमध्ये एका मुलाखतीदरम्यान हे विधान केले. या विधानाची सध्या चर्चा होत आहे.

झेलेन्स्की काय म्हणाले?
बुधवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर झेलेन्स्की यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. झेलेन्स्की म्हणाले की, 'तो (पुतिन) लवकरच मरेल आणि ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर हे युद्ध देखील संपेल.' युक्रेन आणि रशियाने ३० दिवसांसाठी ऊर्जा प्रतिष्ठानांवर हल्ले थांबवण्याचे मान्य केले असताना झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल ही टिप्पणी केली.
झेलेन्स्कींचा रशियावर आरोप
पॅरिसमध्ये माध्यमांशी बोलताना, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी शांततेच्या प्रयत्नांना न जुमानता रशिया 'संघर्ष लांबवत असल्याचा' आरोप केला. ते म्हणाला, 'रशियाला हे युद्ध चालू ठेवायचे आहे, ते ते लांबवत आहे.' युद्ध खरोखर संपावे म्हणून आपल्याला रशियावर दबाव आणण्याची गरज आहे.
पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल अफवा
गेल्या अनेक महिन्यांपासून रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. पुतिन हे सतत खोकताना आणि त्यांचे हातपाय थरथरतानाचे व्हिडिओ अनेकदा प्रसार माध्यमांसमोर आले आहेत. ते गंभीर आजारी आहेत, अशा अफवांना सध्या ऊत आला आहे. २०२२ मध्ये पुतिन यांचे माजी संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्याशी भेटतानाचा एक व्हिडिओ समोर आला. यावेळी ते समोरच्या टेबलाला धरून खुर्चीवर वाकून बसलेले दिसले. पुतिन पार्किन्सन आजार आणि कर्करोगाने ग्रस्त असल्याचेही अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. तथापि या अहवालांची पुष्टी होऊ शकली नाही.
युद्ध कधी सुरू झाले?
२४ फेब्रुवारी २०२२ रोजी, रशियाने युक्रेनवर पूर्ण हल्ला केला आणि युद्धाची सुरुवात केली. रशियन सैन्याने युक्रेनमधील कीव, खार्किव्ह आणि मारियुपोलसह अनेक शहरांवर हल्ला केला. युक्रेनने जोरदार निषेध केला, त्यानंतर संघर्ष लवकरच पूर्ण युद्धात रूपांतरित झाला. रशियाच्या आक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या गोंधळात, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की देश सोडून पळून गेल्याच्या अफवा पसरल्या, परंतु तसे झाले नाही. युद्ध अजूनही सुरूच आहे.












Click it and Unblock the Notifications