पंतप्रधान मोदींसोबत पॉडकास्ट करणारा लेक्स फ्रिडमन कोण आहे? त्याने ४५ तासांचा उपवास का केला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्यातील विशेष संभाषणाचा पॉडकास्ट आज रविवारी प्रसिद्ध झाला. या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी त्यांचे बालपण, हिमालयात घालवलेला वेळ आणि सार्वजनिक जीवनातील प्रवासाशी संबंधित अनेक पैलूंवर चर्चा केली. या संभाषणाची माहिती स्वतः पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केली. त्यानंतर मोदींची एवढी प्रदीर्घ मुलाखत घेणारा लेक्स फ्रिडमन नेमका कोण आहे, हा प्रश्न विचारला जाऊ लागला. याच लेक्स विषयी आपण आज माहिती घेऊयात...

लेक्स फ्रीडमन कोण आहे?
लेक्स फ्रीडमन हा एक प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर आणि संशोधक आहे. त्यांचा जन्म ताजिकिस्तान सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकातील एका ज्यू कुटुंबात झाला. त्याचे खरे नाव अलेक्सी अलेक्झांड्रोविच फ्रीडमन आहे. त्यांचे बालपण रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये गेले. जेव्हा लेक्स ११ वर्षांचा होता तेव्हा त्याचे कुटुंब अमेरिकेतील शिकागो येथे स्थायिक झाले. त्याने तिथेच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांने ड्रेक्सेल विद्यापीठातून संगणक शास्त्रात बॅचलर आणि मास्टर डिग्री मिळवली. २०१४ मध्ये त्यांने इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएचडी देखील पूर्ण केली.
पॉडकास्टर कसा झाला?
लेक्स फ्रीडमन यांने पीएचडी करत असताना २०१४ मध्ये गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. सहा महिन्यांनंतर त्याने गुगल सोडले. २०१५ मध्ये त्यांने अमेरिकेतील प्रसिद्ध तंत्रज्ञान संस्था एमआयटीच्या एज लॅबमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथे त्यांनी मानसशास्त्र आणि बिग डेटा क्षेत्रात संशोधन केले. २०१९ मध्ये त्यांने टेस्लाच्या ऑटो-पायलट सिस्टमवर एक संशोधन पत्र प्रकाशित केले. हे संशोधन इतके प्रभावी होते की टेस्लाचे संस्थापक एलोन मस्क यांचेही लक्ष त्याकडे वेधले गेले. एलोन मस्कने या अभ्यासाचे कौतुक केले आणि फ्रीडमनला मुलाखतीसाठी त्यांच्या कार्यालयात आमंत्रित केले. त्यानंतर फ्रीडमनने संशोधन सोडून दिले आणि पॉडकास्टिंगच्या जगात प्रवेश केला.
कुणाच्या घेतल्या मुलाखती?
लेक्स फ्रीडमन यांनी २०१८ मध्ये त्यांचे पॉडकास्ट सुरू केले. सुरुवातीला त्यांनी त्याचे नाव 'द आर्टिफिशियल इंटेलिजेंस पॉडकास्ट' ठेवले. २०१९ मध्ये जेव्हा त्यांनी एलोन मस्कची मुलाखत घेतली तेव्हा हा पॉडकास्ट खूप लोकप्रिय झाला. यानंतर त्यांनी त्याचे नाव बदलून 'लेक्स फ्रीडमन पॉडकास्ट' असे ठेवले. आज त्यांचा पॉडकास्ट जगातील सर्वात प्रसिद्ध पॉडकास्टपैकी एक मानला जातो. यामध्ये तो राजकारण, तंत्रज्ञान, समाज आणि जीवनाशी संबंधित विषयांवर चर्चा करतो. डोनाल्ड ट्रम्प, एलोन मस्क, मार्क झुकरबर्ग, बेंजामिन नेतान्याहू आणि नोम चॉम्स्की असे अनेक सेलिब्रिटी त्यांच्या पॉडकास्टवर दिसले आहेत.
पाॅडकास्टसाठी केला उपवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या या खास मुलाखतीच्या सन्मानार्थ लेक्स फ्रीडमन याने फक्त पाणी पिऊन ४५ तास उपवास केला. लेक्स फ्रिडमन यांने त्यांच्या मुलाखतीत हे उघड केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपवासाच्या विषयावर आपले विचार मांडले. उपवासाचे फायदे, इंद्रियांना होणारे फायदे, मानसिक फायदे याबाबत मोदींनीही फ्रिडमन याला सखोल ज्ञान दिले.


Click it and Unblock the Notifications
